Uddhav Thackeray on Devendra Fadnavis: ‘विजयी मेळाव्यात रुदालीचे भाषण झाले’ अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते देवेंद्र् फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केल्यानंतर त्यावर उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. शनिवारी ५ जुलै रोजी वरळी डोम येथे झालेल्या विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीका केली होती. त्यासंदर्भात प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडलं. यावर आता उद्धव ठाकरेंनीही खोचक शब्दांत देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.
मूळ भाजपा यांनी मारला – उद्धव ठाकरे
आज विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिक्रियेबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर उद्धव ठाकरेंनी मूळ भाजपा मेला आहे, असं विधान केलं. “मी त्यांची मानसिकता समजू शकतो. कारण मूळ भाजपा मेलेला आहे. त्याचा खून या लोकांनी केला आहे. रुदाली हाही हिंदी शब्द आहे. त्यामुळे त्यांनी उर बडवायला आमच्या पक्षातून, काँग्रेसमधून, राष्ट्रवादीतून आणि देशभरातल्या पक्षांमधून उरबडवे घेतले आहेत. कारण मूळ भाजपा मेला आहे. या लोकांनी भाजपाला मारून टाकलंय”, असं उद्धव ठाकरे प्रसारमाध्यमांना म्हणाले.
“दु:ख व्यक्त करण्यासाठी उर बडवायलाही यांच्याकडे मूळ माणसं नाहीयेत. त्यांना ती माणसंही इतर पक्षातून घ्यावी लागत आहेत. मी फडणवीसांची प्रतिक्रिया समजू शकतो. पण मराठी माणसाचे आनंदाचे क्षण ज्यांना रुदाली वाटत असतील, ती अतिशय विकृत आणि हिणकस वृत्तीची माणसं आहेत”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
शनिवारी उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार वरळी डोम येथे मराठी भाषा विजयी मेळावा पार पडला. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणाला रुदालीची उपमा दिली होती.
“मला सांगण्यात आले होते, की विजयी मेळावा होणार आहे. पण त्या ठिकाणी तर रुदालीचे भाषणही झाले. मराठीबद्दल एक शब्दही न बोलता आमचे सरकार गेले, आमचे सरकार पाडले, आम्हाला सत्ता द्या, निवडून द्या असा प्रकार तिथे सुरू होता.मुळात त्यांना त्रास याचा आहे, की २५ वर्षे महापालिका असताना दाखवण्यालायक ते काहीही काम करू शकले नाहीत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
दरम्यान, मराठीच्या आग्रहासंदर्भात थेट पहलगाममधील दहशतवाद्यांशी तुलना होत असल्याची विचारणा माध्यम प्रतिनिधींनी केली असता त्यावरही उद्धव ठाकरेंनी टीका केली. “हे महाराष्ट्राचे आणि मराठीचे मारेकरी आहेत. जो मराठी माणूस न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करतो, त्याची तुलना जे कुणी भाजपावाले पहलगामच्या दहशतवाद्यांशी करत असतील, तर ते मराठीचे मारेकरी आहेत. मग पहलगामचे दहशतवादी भाजपात गेले का? हे त्यांनी सांगावं. ते गेले कुठे? ज्यांनी आमच्यावर आरोप केला, त्यांच्या घरात राहात आहेत का? लाज वाटली पाहिजे. एकतर तुम्ही हिंदूंनाही वाचवू शकत नाही. वर मराठी माणसावर अन्याय करणाऱ्यांची तुम्ही बाजू घेता. असे कर्मदरिद्री लोक महाराष्ट्रात राज्यकर्ते आहेत, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे”, असं ते म्हणाले.