Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी औसा या ठिकाणी भाषण करताना महायुतीवर कडाडून टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, की मी ऐकलं अमित शाह म्हणाले की पुन्हा सत्ता आल्यानंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार. मग मिंध्यांना म्हणा की आता भांडी घास. अजित पवारांना म्हणावं की मिंध्यांना ती भांडी घासायला माती द्या. बसा दोघं भाजपाची भांडी घासत. मोदी पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसायला लायक नाहीत. अमित शाह हे गृहमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसायला लायक नाहीत. कारण तुम्ही तुमचं काम सोडून प्रचारासाठी फिरत आहात. महाराष्ट्र आता तुमच्या थापांना कंटाळला आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. औसा या ठिकाणी उद्धव ठाकरेंची सभा पार पडली, या सभेत उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) भाजपावर जोरदार टीका केली.

उद्धव ठाकरेला संपवलं आहे तर त्याला अजून का घाबरता?

उद्धव ठाकरेला ( Uddhav Thackeray ) जर तुम्ही संपवलं आहे तर त्याला अजून का घाबरता? असा सवाल उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना विचारला आहे. मला सोलापूरला जायचं होतं पण तिथलं एअरपोर्ट बंद आहे. ही काय लोकशाही आहे का? माझी बॅग जर तपासली जात असेल तर मोदी आणि शाह यांचीही बॅग तपासली पाहिजे. माझी येताना बॅग तपासता तशी मोदी शाह यांची जाताना बॅग तपासा. यांना मतदान करुन आपल्या चक्रव्युहात अडकू नका. महायुतीला मत म्हणजे गुजरातला मत असं म्हटलं तर काय चुकीचं बोललो? आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करु वगैरे पान्हा फुटला आहे. आता कशाला आठवण आली? आम्ही केलं होतं शेतकऱ्यांना कर्जमुक्त. पिक वीमा मिळत नाही पण जीएसटी कचकून घेत आहेत. काही लोकांना २७ रुपयांचा चेक आला. ५१ रुपयांचा चेक, १२३ रुपयांचा चेक हा यांचा पीक विमा. अशी टीका उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) केली.

हे पण वाचा- Uddhav Thackeray : “तुमचं नियुक्ती पत्रक दाखवा, पाकिटातील पैसे दाखवा”, सामानाची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनाच उद्धव ठाकरेंनी घेतलं फैलावर!

देवाभाऊ, दाढीभाऊ आणि जॅकेटभाऊ, तिघं मिळून महाराष्ट्र लुटून खाऊ

देवाभाऊ, दाढीभाऊ आणि जॅकेटभाऊ तिघं मिळून महाराष्ट्राला लुटून खाऊ हे यांचं धोरण आहे. मिंधेंनी तर ताळतंत्र सोडून दिलं आहे. जाऊ तिथे खाऊ हेच त्यांचं धोरण आहे. दीड वर्षापूर्वी पंतप्रधान आले होते आणि रस्त्याच्या कामांचा शुभारंभ केला. आपण केलेल्या कामांवरच ते नारळ फोडले. ते काम किती हजार कोटींनी वाढलं ते बघा. सगळे पैसे एकनाथ शिंदेंच्या कंत्राटदारांच्या खिशात जात आहेत. तुम्ही ठरवायचं आहे की तुम्ही तुमच्या मुलांचं भवितव्य दरोडेखोरांच्या हाती देणार की निष्ठावान मावळ्यांच्या हातात देणार? महाराष्ट्र काय म्हणून ओळखला गेला पाहिजे शिवरायांचा स्वाभिमानी महाराष्ट्र की अदाणीचा लाचार महाराष्ट्र हे तुम्ही ठरवायचं आहे. असं उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्र मोदी-शाह यांना दिल्लीत बसून हाकता येणार नाही

महाराष्ट्र दिल्लीत बसून मोदी-शा यांना हाकता येणार नाही हे लक्षात ठेवा असंही उद्धव ठाकरेंनी औसा येथून भाजपाला ठणकावलं. मोदी आणि शाह महाराष्ट्र संपवायला निघाले आहेत. महाराष्ट्र लुटण्याच्या आड कुणी येऊ शकत असेल तर ती फक्त हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांची शिवसेना आहे. त्यांनी शिवसेनेवर घाव नाही घातलेला तर महाराष्ट्राच्या मूळावर घाव घातला आहे अशीही टीका उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) केली.