राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर महिन्याभराने अखेर मंत्रीमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडला. मात्र, अद्याप मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आलेलं नाही. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सरकारवर तोंडसुख घेतलं जात असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज एकनाथ शिंदे सरकारवर परखड शब्दांत टीका केली आहे. ‘मार्मिक’ व्यंगचित्र साप्ताहिकाच्या ६२व्या वर्धापनदिनी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातून उद्धव ठाकरेंनी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

शिंदे गटाला उद्धव ठाकरेंनी सुनावलं!

आम्हीच मूळची शिवसेना असा दावा करणाऱ्या शिंदे गटाला उद्धव ठाकरेंनी टोला लगावला आहे. “काही जणांना असं वाटतं की शिवसेना उघड्यावर पडलेली वस्तू आहे जी कुणीही उचलून घेऊन जाऊ शकतं. पण तसं नाहीये. शिवसेनेची पाळंमुळं ही किमान ६२ वर्ष तरी दिसत आहेत. माझ्या आजोबांनी ही विचारांची पेरणी केली होती”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

“मंत्री आहेत कुठे?”

दरम्यान, राज्यात अद्याप खातेवाटप न झाल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला सवाल केला आहे. “राज्यात काही ठिकाणी अतीवृष्टी झाली आहे. पण महाराष्ट्रातलं सरकार आहे कुठे? काहीही न करता स्वत:चे सत्कार करून घेतले जात आहेत. पण अतिवृष्टीमुळे शेतकरी बेहाल झाला आहे. तिकडे जायला मंत्री कुठे आहेत? मंत्र्यांचं खातेवाटपच झालेलं नाही. सगळे मंत्री आज आझाद आहेत. आझादी का अमृत महोत्सव. पदं मिळाली आहेत, पण जबाबदारी नाहीये. करा मजा”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आपण पुन्हा गुलामगिरीकडे जातोय का?”

“आपण स्वतंत्र होऊन ७५ वर्ष झाली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना पुन्हा आपण गुलामगिरीकडे जात आहोत का? हा विचार करण्याची वेळ आली आहे”, असंही ते म्हणाले. “व्यंगचित्रकारांना एवढंच सांगतो, की देश पुन्हा गुलामगिरीकडे जात असेल, तर तुम्ही त्यावर तुमच्या ब्रशचे फटकारे मारलेच पाहिजेत”, असं उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना नमूद केलं.