शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर पक्षाचे अधिकृत नाव व चिन्ह निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना दिले. पक्षाचे चिन्ह निवडणूक आयोग दुसऱ्याला देऊ शकते, पण नाव देण्याचा अधिकार त्यांना नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला धोंड्या म्हणत टीका केली आहे.

“उद्धव ठाकरे नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे याला अर्थ आहे. मी स्वत: शून्य आहे. आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद, पुण्याई विसरु नको असं बाळासाहेब नेहमी सांगायचे. ठाकरे संघर्ष करत आहेत, पण आमचं नाव कोणी चोरु शकत नाही. चिन्ह वैगेरे चोरलं तरी आमच्यावरील प्रेम, विश्वास कसं चोरणार? तो खोक्यातून विकला जात नाही,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

पक्ष, चिन्ह चोरलं तेव्हा मातोश्रीवर हक्क सांगण्याचा प्रयत्न केला असं संजय राऊतांनी विचारलं, त्यावर तो त्यांच्या मातोश्रीचा अपमान आहे. ते आपल्या मातोश्रीला मानत नाहीत असा टोला ठाकरेंनी लगावला.

“पक्ष, चिन्ह, डुप्लिकेट शिवसेना भाजपात विलीन करण्यासाठी निघाले आहेत. त्यांच्याकडे दुसरा पर्याय काय आहे. गुरुपौर्पिणेमेचं वर्णन तुम्ही केलं आहे. ते चित्रच डोळ्यांसमोर उभं राहिलं, असे जे असतात ते पराबवलंबी असतात,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

त्यांचा पहिला पर्याय घालीन लोटांगण वंदीन चरण – उद्धव ठाकरे

“अमित शाह, निवडणूक आयोग यांनी जी आपली शिवसेना अधिकृतपणे दुसऱ्यांच्या हातात दिली आहे, ते शिवसेना भाजपात कशाप्रकारे विलीन करू शकतात? हा शिवसेनेचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न आहे का? असा प्रश्न संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंना विचारला. त्यावर उद्धव म्हणाले, “हो. पण ते अस्तित्व संपवू शकत नाहीत. इतकी वर्षे होऊनही ते जनतेला माझ्यापासून तोडू शकत नाहीत, हेच त्यांचं दुःख आहे. त्यामुळे त्यांच्याकडे शेवटचा पर्याय तोच आहे. त्यांचा पहिला होता घालीन लोटांगण वंदीन चरण करायचं आणि दुसरा पर्यायच नाही,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

धोंड्याला शेंदूर फासणारे दिल्लीत बसलेत – उद्धव ठाकरे

“एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही काही चोराचोरी केली तरी कदाचित शिवसेनेचे निवडणूक चिन्ह हे निवडणूक आयोग दुसऱ्याला देऊ शकेल किंवा गोठवू शकेल. खरं तर ते गोठवायला पाहिजे, असा वाद असेल तर. पण शिवसेना नाव ते दुसऱ्यांना देऊ शकत नाही. तो अधिकारच निवडणूक आयोगाला नाही. कारण शिवसेना हे नाव माझ्या आजोबांनी आणि माझ्या वडिलांनी दिलेलं आहे. उद्या मी निवडणूक आयुक्ताचं नाव बदलून धोंड्या ठेवलं तर अधिकार आहे का? पण माझं नाव बदलल्यावर मी त्याला धोंड्याच म्हणणार. त्या धोंड्याला पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नाही, जर लोकशाहीत आम्ही काही वेडं-वाकडं वागलो असू तर चिन्ह तुम्ही काढून घेऊ शकता, पण संविधानानुसार आम्ही काही चूक केली नसेल तर ते आमचं चिन्ह काढू शकत नाहीत. मतांची टक्केवारी वगैरे फक्त चिन्हापुरतं आहे, पण नाव नाही देऊ शकत. धोंड्याने ते बेकायदेशीर केलंय. धोंड्याला शिवसेना नाव दुसऱ्याला देताच येत नाही. ते त्याच्या अधिकाराबाहेरचं आहे. पण त्या धोंड्याला शेंदूर फासणारे दिल्लीत बसलेत म्हणून चालतंय,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चोर तो चोरच – उद्धव ठाकरे

“लोक धोंड्याचं ऐकणार नाही. चोरीचा माल आहे. जर तुम्ही चोरून मतं मिळवलीत आणि त्याच्यावर मर्दुमकी गाजवत असाल तरी चोर तो चोरच आहे,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.