शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना आज रस्त्यावर उतरली. छत्रपती संभाजीनगरमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी हंबरडा मोर्चा काढण्यात आला. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे देखील मोर्चात सहभागी झाले. यावेळी उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

उद्धव ठाकरे म्हणाले की, पंधरा दिवसांपूर्वी मी मराठवाड्यात आलो होतो. शेतकऱ्यांना भेटलो तेव्हाच मी जाहीर केलं जोपर्यंत हे सरकार कर्जमाफी करत नाही, तोपर्यंत या सरकारला आम्ही सोडणार नाही. गेल्या वेळेला आलो तेव्हा पाऊस होता, यावेळी आलो तेव्हा कडक ऊन आहे. इतर वेळेला शिवसेना तुमच्यासोबत आहेच पण ज्यावेळेस तुमच्यावर संकट येईल त्यावेळेस शिवसेना तुमच्या खांद्याला खांदा लावून सोबत आहे. हेक्टरी ५० हजार रुपयांच्या मदतीची मागणी शेतकऱ्यांशी बोलूनच केली आहे. सरकारने जाहीर केलेले पॅकेज शेतकऱ्यांना अमान्य आहे. सरकारचे पॅकेज ही मोठी थाप असून स्वतःचीच पाठ खाजवून घेत आहेत, थोपटून घेत आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, पन्नास हजार रुपये हेक्टरी आपण कोणाकडे मागत आहोत तर ५० खोके ज्यांनी घेतले आहे त्यांच्याकडे मागत आहोत. त्यामुळे ते सहजासहजी वठणीवर येणार नाहीत. तुम्हाला चाबूक हातात घ्यावा लागेल आणि यांना बरोबर वठणीवर आणावे लागेल. पॅकेज पाहिल्यावर सगळ्यांना असं वाटलं की इतिहासातलं सर्वात मोठं पॅकेज आहे. पण नाही ही इतिहासातली सर्वात मोठी थाप आहे. आजपर्यंत इतकी मोठी थाप कोणत्याही सरकारने मारलेली नाही. इतकी मोठी थाप देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मारलेली आहे. काल, परवा देशाचे पंतप्रधान मुंबईत येऊन गेले. त्यांच्या भाषणामध्ये शेतकऱ्यांबद्दल काही उल्लेख होता का? ज्या पंतप्रधानांना आपण जिथे चाललो आहोत तिथली परिस्थिती माहित नाही तर आपण त्यांच्याकडे काय न्याय मागत आहोत? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

कैलास तुम्ही जे म्हणालात राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला. पण आता एका क्षेत्र शेतकऱ्याने सांगितले की, साहेब हातात टरबूज दिलं. ही शेतकऱ्यांची थट्टा चाललेली आहे. मी या सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजचे समर्थन करायला तयार आहे. पण माझी एक अट आहे. मुख्यमंत्री बोललेत खरडून गेलेल्या जमिनीला पर हेक्टरी मनरेगातून साडेतीन लाख रुपये देणार आहोत. मग मी मुख्यमंत्र्यांना आव्हान देतोय की, तुमची नियत असेल तर दिवाळीपूर्वी तीन लाखातील एक लाख रुपये माझ्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा करा, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.