सांगली : राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील पात्र ३३ बालकांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया मुंबईतील पंचतारांकित रुग्णालयात करण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून ही योजना राबविण्यात येत असून, शून्य ते १८ वयोगटातील हृदयाचे आजार असलेल्या १२८ रुग्णांची इको चाचणी डॉ. भूषण चव्हाण यांनी केली. या पैकी ३३ बालकांच्या शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे.

संशयित हृदय रुग्ण आढळलेल्या बालकांची इको तपासणी करण्यासाठी सांगलीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे व उप जिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बिभीषण सारंगकर उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिबिरातील १२८ लाभार्थींच्या इको तपासणीचा अंदाजित खर्च ४ लक्ष रुपये व अंदाजित ३३ लाभार्थ्यांच्या शस्त्रक्रियांचा प्रति शस्त्रक्रिया अंदाजित ३ लक्ष रुपये प्रमाणे एकूण खर्च १ कोटी, याप्रमाणे एकत्रित एकूण १ कोटी ४ लक्ष रुपयांचे कामकाज जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून पूर्णपणे मोफत होणार आहे.राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत आजअखेर १ हजार ८५० लाभार्थ्यांच्या हृदय शस्त्रक्रिया व २८ हजार ५०० लाभार्थ्यांच्या इतर शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. जिल्हा समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी, कार्यक्रम सहायक अनिता हसबनीस व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अधिकारी व कर्मचारी यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.