राज्यातील डबल इंजिन सरकार आता तीन चाकी झाले आहे. राष्ट्रवादी (अजित पवार), शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपा असे तीन चाकी सरकार सत्तेवर असून यामुळे शिंदे गटातील आमदारांची कोंडी झाल्याचं बोललं जात आहे. राज्यातील मंत्रीमंडळ विस्तार अद्यापही रखडला असून यात आता राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांची भर पडल्याने विस्तारात आता आणखी नऊ वाटेकरी आले आहेत. त्यामुळे शिंदे गटातील किती आमदारांना आता मंत्रिपदे मिळणार हे पाहावं लागणार आहे. दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मोठं भाष्य केलं आहे. शिंदे गटातील आठ ते नऊ आमदारांनी आमच्याशी संपर्क केल्याचं ते म्हणाले आहेत. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

“राज्यात गलिच्छ आणि घाणेरडे राजकारण सुरू आहे. यामुळे महाराष्ट्राची देशात बदनामी होतेय. यशवंतराव चव्हाणांनी संयुक्त महाराष्ट्राचा कलश आणला. यासाठी श्रीपाद डांगे, आचार्य आत्रे यांसारख्या थोर नेत्यांचं योगदान लाभलं. त्या संयुक्त महाराष्ट्राला कुटुंब फुटीचा काळिमा लागला आहे. एवढंच नव्हे तर कुटुंब फुटल्यानंतर एकमेकांवर घाणेरडे आरोप-प्रत्यारोप केले जातात. याकडे जनता तुश्चतेने पाहतेय. याची देशभरात निर्भत्सना केली जातेय”, असं विनायक राऊत म्हणाले.

हेही वाचा >> Video: “मी पुन्हा दावा करतो की…”, मुख्यमंत्री पदावरून संजय राऊतांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “महाराष्ट्राला…”

“अजित दादा आणि कंपनीने तिथे (शिंदे-भाजपा सरकारमध्ये) उडी मारली, त्याचदिवशी शिंदे गटातील आमदारांनी चळवळ करायला सुरुवात केली आहे. त्यांचा होत असलेला उद्रेक आणि तो थांबवताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्रेधातिरपीट पाहिल्यानंतर खूप दयनीय अवस्था झालेली आहे. त्यानंतर आता खूप जणांनी आता आम्ही ज्या घरात होतो तेच बरं आहे. आम्हाला पुन्हा एकदा मातोश्रीने साद घातली तर आम्ही नक्कीच त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊ अशी वक्तव्य काही लोकांकडून आल्याचं मी पाहिलंय. त्या उपरसुद्धा पश्चिम महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील लोक म्हणताहेत, जे होतं तेच बरं आहे, पुनश्च एकदा मातोश्रीची क्षमा मागावी असं वाटतंय अशी चर्चा चालू आहे”, असं विनायक राऊत म्हणाले.

आठ ते दहा आमदारांनी संपर्क साधला

शिंदे गटात अस्वस्थता असल्याने बंडखोरी केलेले अनेक आमदार स्वगृही परतणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. दरम्यान, अशाप्रकारे आठ ते दहा आमदारांनी संपर्क साधल्याचा दावा विनायक राऊतांनी केला. ते म्हणाले की, “आठ ते दहा आमदारांनी गेल्या दोन दिवसांत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संपर्क साधला आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा >> शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची सारखीच अवस्था !

बंडखोरांना परत घेणार का?

शिंदे गटातील आमदारांनी खरेच स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला तर त्यांना पुन्हा घेणार का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. यावर विनायक राऊत म्हणाले की, “त्यांना परत घेऊ नये या विचाराचे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. परंतु यावर अंतिम निर्णय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील.