विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठी राहुल गांधी बुधवारी रात्री दिल्लीतून इंडिगो विमानाने नागपूरला येत असताना काही प्रवासी व प्रसारमाध्यमांनी नियमाचे उल्लंघन केल्याने त्याचा विमानातील सहप्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
राहुल गांधी दिल्लीवरून नागपूरला येण्यासाठी निघाले असताना त्यांच्यासोबत दिल्लीतील प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी होते. दिल्लीत राहुल गांधी यांच्याभोवती काही वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी संवाद साधण्यासाठी गर्दी केल्यामुळे नियोजित वेळेपेक्षा एक तास उशिरा विमान दिल्लीवरून निघाले. त्यानंतर त्यांच्याभोवती असलेले काही वाहिन्यांचे प्रतिनिधी विमानाच्या कॉरिडोरमध्ये आले. त्यामुळे अनेक प्रवासी त्यांच्याभोवती जमा झाले आणि एकच गोंधळ उडाला. त्यामुळे विमानातील कर्मचारी संभ्रमित झाले आणि ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना आता बस करा, अशी विनंती करू लागले. विमान उडण्यास त्रास होत आहे आणि वेळप्रसंगी अपघातसुद्धा होऊ शकतो, असेही त्यांनी प्रवाशांना आणि प्रतिनिधींना सांगितले. मात्र, कोणीही ऐकण्यास तयार नव्हते. हा गोंधळ सुमारे १ तास १० मिनिटे सुरू होत असताना नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर विमान उतरविणे कठीण झाले होते. जोपर्यंत प्रत्येक जण आपल्या जागेवर बसणार नाही तोपर्यंत विमान खाली उतरविणे शक्य होणार नाही, अशी विनंती वारंवार विमानातील कर्मचाऱ्यांकडून केली जात होती. मात्र, तरीही काहींनी त्याकडे दुर्लक्ष केले. या गोंधळामुळे अपघात झाला असता तर जबाबदार कोण असते, असा सवाल काही प्रवाशांनी केला.
राहुल यांच्या प्रवासात अतिउत्साहींमुळे मनस्ताप
विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठी राहुल गांधी बुधवारी रात्री दिल्लीतून इंडिगो विमानाने नागपूरला येत असताना काही प्रवासी व प्रसारमाध्यमांनी नियमाचे उल्लंघन केल्याने त्याचा विमानातील सहप्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
First published on: 01-05-2015 at 02:28 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unexpected enthusiastic troubles rahul gandhis journey