निवडणुकीतील खर्चाचा हिशोब दिला नाही या कारणावरून जतच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह ९ जणांना आपले पद गमावण्याची वेळ आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय दिल्यानंतर अपिलामध्ये नगरविकास राज्यमंत्र्यांनीही ९ जणांच्या अपात्रेतेचा निर्णय कायम ठेवल्याने ९ नगरसेवक अपात्र ठरले आहेत.
जत नगरपालिकेची पहिली निवडणूक २०१२ मध्ये झाली. निवडणूक निकालानंतर ३० दिवसांच्या आत म्हणजे २ जानेवारी २०१३ पर्यंत नवनिर्वाचित सदस्यांना आपला निवडणूक खर्च विहित नमुन्यात देणे बंधनकारक होते. मात्र ९ सदस्यांनी आपला खर्च निवडणूक यंत्रणेकडे विहीत नमुन्यात मुदतीत सादर केला नाही. या कारणास्तव तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी या ९ जणाना अपात्र ठरविले होते.
अपात्र ठरविलेल्या सदस्यामध्ये नगराध्यक्ष इकबाल गवंडी, उपनगराध्यक्ष श्रीकांत िशदे, मनोहर पट्टणशेट्टी, माया शंकर साळे, संगीता भरू माळी, नंदा कबीर कांबळे, शुभांगी अशोक बन्नेनवार, नीनाबाई कृष्णा कोळी व सुजय िशदे या विद्यमान सदस्यांसह पराभूत उमेदवार बशीर बादशाह मुल्ला यांच्यावर कारवाई करण्यात आली. या सर्वानी निवडणूक खर्चाचा तपशील दिला नाही या कारणावरून जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवित यापुढील ३ वष्रे निवडणूक लढविण्यास मनाई आदेश बजावला होता.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला या सर्वानी नगरविकास मंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे अपिल दाखल केले होते. हे अपिल राज्यमंत्र्यांनी फेटाळले असून या सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम राहिली आहे. राज्यमंत्र्यांनी अपिल फेटाळल्यानंतर अपात्र ठरलेले सदस्य उच्च न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीत आहेत.