केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून तक्रार केली आहे. राज्यातील महामार्गाच्या कामांमध्ये शिवसेना कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी अडथळे आणत असल्याची तक्रार नितीन गडकरी यांनी केली आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंकडे महामार्गाच्या कामात येणाऱ्या अडचणींची दखल घेण्याची विनंती केली आहे. केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्या लेटर बॉम्बने एकच खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या दोन पानी पत्रात राज्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामात शिवसेनेचे लोकप्रतिनिधी अडथळा आणत असल्याची तक्रार गडकरी यांनी  केली आहे. राज्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांत तीन ठिकाणी नियमबाह्य कामांसाठी अधिकारी आणि कंत्राटदार यांना त्रास दिला जात आहे, यामुळे काम बंद पडण्यापर्यंत परिस्थिती गेली असल्याबद्दल तीव्र संताप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केला आहे. एवढंच नाही ही परिस्थिती कायम राहिली तर कामे सुरु ठेवावीत का ? याचा विचार आपला विभाग करत आहे अशी स्पष्ट भूमिका गडकरी यांनी घेतली आहे.

अर्धवट रस्त्यांची कामे ही रस्ते वाहतुकीस धोकादायक ठरतील आणि अपघातांचे प्रमाण वाढेल अशी भिती गडकरी यांनी व्यक्त केली आहे. कामात अडथळे आणणारी अशी परिस्थिती कायम राहिली तर यापुढे राज्यातील राष्ट्रीय महामार्गांची कामे मंजूर करण्याबाबात विचार करावा लागेल असा गंभीर इशारा या पत्राद्वारे गडकरी यांनी दिला आहे.

कोणत्या ठिकाणी कामांत अडथळा आणला जात आहे ?

वाशिम शहराच्या १२ किलोमीटर बायपास रस्त्याचे काम सुरु आहे. परंतू शिवसेना लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे बायपास आणि त्याला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम थांबले असल्याचं पत्रात नमूद केलं आहे.

मालेगाव – रिसोड राष्ट्रीय महगामार्गावर पैनगंगा नदीवरील उंच पुलाचे काम अर्धवट झाले आहे. हे काम पुर्ण करण्यास अडथळा आणत कार्यकर्त्यांकडून धमक्या दिल्या जात असल्याची तक्रार पत्रामध्ये केली आहे.

वाशिम जिल्ह्यातील सेलू बाजार गावातून जाणाऱ्या रस्त्याचे काम शिवसेना कार्यकर्त्यांमुळे थांबले आहे. यामध्ये मशिनरीची जाळपोळ करण्यात आल्याचा पत्रात उल्लेख केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union minister nitin gadkri letter to maharashtra cm uddhav thackeray sgy
First published on: 14-08-2021 at 13:08 IST