सांगली : शहरातील अत्यंत वर्दळ असलेल्या कर्मवीर चौकामध्ये अज्ञात तरूणांने हिसडा मारून ४० तोळे सोन्याचे दागिने असलेली पिशवी हातोहात लंपास करण्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी सकाळी घडला. वेगवान दुचाकीवरून चोरटा पसार झाला असला तरी पतसंस्थेच्या छायाचित्रण यंत्रणेत बंदिस्त झाला असून त्याच्या शोधासाठी पोलीसांची चार पथके तैनात करण्यात आली आहेत. सांगली-मिरज रस्त्यावरील क्रांती यिलनिकजवळ वास्तव्य असलेले धनचंद्र भाउराव सकळे (वय ६५) हे घरातील सोन्याचे अलंकार सुरक्षित ठेवण्यासाठी कर्मवीर पतसंस्थेत निघाले असताना चोरट्याने अचानक येउन त्यांच्या हातातील हिरवी पिशवी हिसडा मारून लंपास केली.

सकळे यांच्या घरी लग्नाचा विधी होता. यासाठी त्यांनी पतसंस्थेच्या लॉकरमध्ये ठेवलेले सोने घरी नेले होते. लग्न झाल्यानंतर ते परत सुरक्षित पतसंस्थेच्या लॉकरमध्ये ठेवण्यासाठी आज घराबाहेर सोने घेउन बाहेर पडले. मोटारीतून ते चालकासह निघाले. सकाळी पतसंस्थेच्या प्रवेशदाराजवळ ते मोटारीतून सोने ठेवलेली हिरवी पिशवी घेउन खाली उतरले. ते उतरल्यानंतर चालकाने मोटार पार्किंगसाठी बाजूला घेतली असतानाच डोळ्याचे पाते न लवते एवढ्या कालावधीत मागून आलेल्या दुचाकीस्वाराने हिसडा मारून सकळे यांच्या हातातील पिशवीवर कब्जा मिळवला. आणि पिशवी घेउन धूम पध्दतीने वेगवान दुचाकीवरून शंभर फुटी रस्त्याच्या दिशेने पसार झाला. हा प्रकार घडताच सकळे यांनी पतसंस्थेच्या दारातच बसकन मारत आरडोआरडा सुरू केला. यामुळे वर्दळीच्या रस्त्यावर नागरिकही तात्काळ जमले. ही माहिती मिळताच उप अधिक्षक श्रीमती विमला, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेची पोलीसांनी गांभीर्याने दखल घेत घटनास्थळी काही धागेदोरे लागतात का याची चौकशी सुरू केली. पतसंस्थेच्या मुख्य प्रवेशदारावर असलेल्या छायाचित्रण यंत्रणेत चोरट्याचे कृत्य बंदिस्त झाले असून हा प्रकार त्यांने एकट्यानेच केला असल्याचे प्रथमदश्रनी आढळून आले. चोरटा मुख्य रस्त्यावर न जाता शंभर फुटी रस्त्याच्या दिशेने पसार झाल्याची माहिती प्रथमदर्शनी मिळाली आहे. या परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या चलतचित्रीकरणाच्या माध्यमातून चोरट्याचा माग काढण्याचा पोलीसांचा प्रयत्न असून चोरट्याच्या शोधासाठी चार पथके तैनात करण्यात आली आहेत.चोरट्याने पाळत ठेवूनच हातसफाई केली असल्याचा तपास यंत्रणेचा कयास असून यासाठी मोटार चालकाकडेही कसून चौकशी करण्यात येत आहे. भरदिवसा ४० तोळे सोन्याचे अलंकार हिसडा मारून लंपास करण्याचा प्रकार वर्दळीच्या रस्त्यावर घडल्याने नागरिकांतूनही आश्‍चर्य व संताप व्यक्त होत आहे.