सावंतवाडी: भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) पर्जन्यमापकानुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज, २१ मे रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत सरासरी ९६.५५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याभरात एकूण ७७२.४ मिमी पाऊस पडला.
आज पडलेल्या पावसानुसार, सर्वाधिक पाऊस वेंगुर्ला तालुक्यात १६२.४ मिमी नोंदवला गेला. त्यानंतर दोडामार्ग तालुक्यात १३७.५ मिमी आणि सावंतवाडी तालुक्यात १३० मिमी पावसाची नोंद झाली.
जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमधील पर्जन्यमान मालवण: ११४ मिमी, कुडाळ: ७५.५ मिमी, कणकवली: ५८ मिमी, देवगड: ५३ मिमी, वैभववाडी: ४२ मिमी आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील पाणीपातळी वाढण्यास मदत होणार असून, शेतीसाठीही हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे. दरम्यान मंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळीवाऱ्यासह पाऊसाने दणादण उडाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बराचसा भाग काळोखात
अवकाळी पाऊस आणि वादळी वारा यामुळे जिल्ह्यातील अनेक भागांत जवळपास सहा सबस्टेशन : मालवण, आचरा, कुंभारमठ, वेंगुर्ला, माणगाव, पेंडुर वीजखंडीत झालेली असून ती पूर्ववत करण्याचे काम MSEB मार्फत करण्यात आले. तसेच सावंतवाडी शहरांमध्ये झाडे कोसळली तर तालुक्यात वीज खंडित झाली. यामुळे सुमारे आठ लाख वीज वितरण कंपनीचे नुकसान झाले. बिगर मौसमी पाऊसाचा सर्वाधिक दणका वीज वितरण कंपनीला बसला आहे.
घरावर झाडं पडल्याने नुकसान
सिंधुदुर्ग जिल्ह्याला बिगरमोसमी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले असून, शेतघरे आणि घरांचे मिळून सुमारे सहा लाख रुपयांचे प्राथमिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. याव्यतिरिक्त शेती बागायती पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ, मालवण, कणकवली, देवगड आणि वैभववाडी या तालुक्यांमधील गावांना या बिगरमोसमी पावसाचा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी घरांचे अंशतः किंवा पूर्णपणे नुकसान झाले आहे, तर शेतीतही मोठे नुकसान झाले आहे.