हवामान बदलाचा शेती क्षेत्राला किती मोठा फटका बसतो, याचा अनुभव सध्या राज्यातील शेतकरी घेत आहेत. सुमारे दीडशे लाख हेक्टर वरील खरीप पिकाचे मातेरे झाल्यानंतर आता रब्बी हंगामातील पिकावर सुद्धा अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे शेती करावी की, करू नये असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतो आहे. इतकी गंभीर परिस्थिती हवामान बदलाने शेती क्षेत्रा पुढे निर्माण झाली आहे.

राज्यातील खरीप हंगामात साधारणता: दीडशे लाख हेक्टरवर पेरणी होते. हे क्षेत्र प्रामुख्याने पावसावर अवलंबून असते. राज्याच्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर खरीप पिके घेतली जातात, त्यात सोयाबीन, कापूस आणि मका ही महत्त्वाची पिके आहेत. यंदा अतिवृष्टीमुळे राज्याच्या बहुतेक भागातील सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे, तर विदर्भ मराठवाड्यातील कापसाला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. मूग मटकीसह अन्य कडधान्यांची अवस्था यापेक्षा वेगळी नाही.

राज्यातील १५० लाख हेक्टर पैकी सुमारे ७० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्यामुळे सरकारला सुमारे ३१ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी लागली. इतके गंभीर आव्हान आहे. सरकारी मदत अत्यंत तुटपुंजी आहे. त्यामुळे प्रत्यक्षातील मदत आणि शेतकऱ्यांना सहन करावा लागलेला तोटा हजारो कोटींच्या घरात जातो. या नुकसानीतून शेतकरी वर घेईल की नाही, तो कधी घेईल आणि कशाप्रकारे घेईल ? सरकार त्याला कशी मदत करेल, हे प्रश्न अनुत्तरित अनुत्तरीत असतानाच लांबलेल्या पावसाने नाकीनऊ आणले आहे.

हा पाऊस कधी संपणार किंवा पावसाळा संपला की, नाही असा प्रश्न लहान थोर विचारू लागले आहेत.

अवकाळी पावसाने, महापुराने कोकण किनारपट्टीवर फारसे नुकसान झाले नव्हते. पण ऑक्टोबर महिन्याचा शेवट आणि नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे किनारपट्टीवरील भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. मुळात किनारपट्टीवर भात हे मुख्य पीक आहे आणि या पिकाचे नुकसान झाले तर किनारपट्टीवरील शेतकरी पुरता मोडून जातो, हे उघड सत्य आहे.

भात कापणीच्या अंतिम टप्प्यात असताना पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान मोठे आहे. संपूर्ण किनारपट्टीवर पडत असलेल्या पावसामुळे भात कापणीला अडचणी येत आहेत. कापून जमिनीवर पडलेल्या भाताला सततच्या पावसामुळे कोंब फुटले आहेत, काही भात काळा पडला आहे. ज्याच्याकडे भात झाकून ठेवण्याची सोय आहे, तोही भात काळा पडल्याचे दिसून येत आहे. एकूणच राज्यातील खरीप हंगामावर पुरते पाणी पडलं असं म्हटलं तर ठरणार नाही.

लांबलेल्या पावसाने रब्बी हंगामावर संकटाचे ढग जमा झाले आहेत. रब्बी हंगामात राज्यात ५० ते ५३ लाख हेक्टरपर्यंत आहे. रब्बी हंगामात प्रामुख्याने गहू, रब्बी ज्वारी, हरभरा, गळीत धान्यांची पिके घेतली जातात. मात्र रब्बी हंगामाच्या सुरुवातीला अपेक्षित असणारी थंडीच न पडल्यामुळे हरभरा पेरणी रखडली आहे. गहू पेरण्याच गहू पेरण्याचा कालावधी निघून चालला आहे. तरीही थंडी पडताना दिसत नाही. थंडी अभावी रब्बीतील पिकांची अपेक्षित वाढ होत नाही.

हवामान विभागाने नोव्हेंबर महिन्यात थंडी पेक्षा पाऊस अधिक असल्याचे असल्याचे जाहीर केल्यामुळे रब्बी हंगामावर अवकाळीचे ढग दिसू लागले आहेत. अशा नुकसानीतून शेतकरी बाहेर पडणे कठीण आहे. सरकारने कितीही मदत केली तरी, ती शेतकऱ्यांसाठी अपुरी आहे. जोपर्यंत शेतीतून जोमदार पीक येत नाही, तोपर्यंत शेतकऱ्याच्या हातात चार पैसे राहणार नाहीत. आता किमान शेतकऱ्यांकडून बाजारात आलेल्या पिकाला तरी हमीभाव मिळावा किंवा हमीभावाने हा सर्व माल खरेदी करावा, एवढीच माफक अपेक्षा शेतकरी ठेवून आहे.