सांगली : अमेरिकेने लागू केलेल्या २५ टक्के आयातशुल्कामुळे मिरज, कुपवाडमधील औद्योगिक क्षेत्रातून होणार्‍या निर्यातीवर गंभीर परिणाम होणार असून, याचा फटका उद्योगाबरोबरच कामगारांवरही होणार आहे, असे कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष सतीश मालू यांनी शुक्रवारी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

कुपवाड आणि मिरज औद्योेगिक वसाहतीमध्ये सुरू असलेल्या १५ कारखान्यांतून उत्पादित होत असलेल्या मालाची थेट निर्यात अमेरिकेला होत आहे. यामुळे सुमारे ६०० कोटींचा व्यवसाय असून, या उद्योगावर शुल्कवाढीचा थेट परिणाम होणार आहे. तसेच दोन्ही औद्योगिक वसाहतींमधून ५० कारखान्यांतून सुटे भाग तयार करण्यात येतात. त्या कारखान्यांवरही अप्रत्यक्ष परिणाम होणार आहे. थेट आणि अप्रत्यक्ष अशा १५०० कोटींची उलाढाल या नवीन करामुळे अडचणीत येणार आहे.

या ठिकाणी तयार होणारी वस्त्रे, फौंड्री उद्योगात तयार होत असलेले यंत्राचे सुटे भाग, रबर, वाहन उद्योगातील सुटे भाग याचे उत्पादन करणारे कारखाने या ठिकाणी असून, अमेरिकेने आयात शुल्कात २५ टक्के वाढ केल्याने या निर्यातीवर परिणाम होणार आहे. याचे नेमके काय परिणाम होतात हे येत्या आठ दिवसांत समोर येणार असून, त्यानंतर उद्योजकांना यावर नेमका कसा फटका बसणार, हे लक्षात येणार आहे.

या उद्योगात सुमारे चार हजार कामगार आहेत. अमेरिकेने आयात शुल्क वाढ केल्याने याचा उत्पन्नावरही परिणाम होणार असून, केवळ दोन ते चार टक्के नफ्यावर हा व्यवसाय अवलंबून आहे. अमेरिकेने केवळ भारतावर २५ टक्के शुल्क लागू केले आहे. मात्र, आपल्या शेजारी असलेल्या पाकिस्तान व बांगलादेशासाठी १९ टक्के आयात शुल्क आहे. यामुळे शेजारी राष्ट्रातून स्वस्त दरात माल मिळत असल्याने अमेरिकेतील आयात करणारे उद्योजक शेजारी राष्ट्रांना प्राधान्य देतील, याचा परिणाम भारतीय निर्यातीवर मोठ्या प्रमाणात होण्याचा धोका असल्याचे श्री. मालू यांनी सांगितले.

आयात मालावर अमेरिकेने जर २५ टक्के  आयात शुल्क  लागू केलेच तर उत्पादित  मालासाठी केंद्र शासनाकडून निर्यात अनुदान मिळाले तर हा आर्थिक नुकसानीचा फटका काही प्रमाणात सुसह्य होणार आहे. केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयातून काही दिवस परिणाम  काय होतात, हे पाहूनच पुढील धोरण निश्‍चित करण्याची भूमिका घेतली असल्याचे श्री. मालू म्हणाले. तथापि, अमेरिकेच्या वाढीव टेरीफमुळे औद्योगिक क्षेत्रात अस्वस्थता निर्माण झाली आहे हे मात्र निश्‍चित. फोटो- कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील उमेद  ग्रुपमध्ये तयार होणारे कापड अमेरिकेस निर्यात करण्यात येते.