दुग्धव्यवसायात आíथक परिवर्तनाची मोठी ताकद असल्याने शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि नवनव्या पद्धतींचा अवलंब करून जिद्द आणि निष्ठेने दुग्धव्यवसायात पुढे यावे, असे आवाहन ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी केले.
जिल्हा परिषदेच्या वतीने दिवंगत वसंतदादा पाटील सभागृहाचे नूतनीकरण करण्यात आले असून या सभागृहाचे उद्घाटन ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी आयोजित समारंभात ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या लोकनेते राजरारामबापू पाटील आदर्श गोपालक पुरस्काराचे वितरण तसेच आरोग्य विभागाच्या वतीने उल्लेखनीय काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कारही ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. समारंभास जिल्हा परिषद अध्यक्ष देवराज पाटील, उपाध्यक्ष बसवराज पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
दुग्ध व्यवसायातून दूध उत्पादनाबरोबरच रोजगार निर्मितीलाही मोठा वाव असल्याचे स्पष्ट करून ग्रामविकासमंत्री जयंत पाटील म्हणाले, दुग्धव्यवसायामध्ये जिल्ह्यातील अनेक शेतकरी सक्रिय झाले असून यापुढील काळातही जिल्ह्यातील विशेषत दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसाय शास्त्रशुद्ध पद्धतीने करून दर्जेदार दूध उत्पादन करण्यात पुढाकार घ्यावा, जनांवरासाठी मुक्त गोठा पद्धतीचाही अवलंब करणे दूध उत्पादकांसाठी हिताचे असल्याचेही ते म्हणाले.
जिल्ह्यात दुग्धव्यवसायाच्या वाढीसाठी शासनस्तरावरूनही अधिक प्रोत्साहन दिले जाईल, असे सांगून ग्रामविकासमंत्री जयंत पाटील म्हणाले, दुग्धव्यवसाय नवनवे तंत्र आणि नवनव्या पद्धती आल्या असून या क्षेत्रातील विकसीत आधुनिक पद्धती आत्मसात करून शेतकऱ्यांनी जिद्द आणि कष्टाने दुग्धव्यवसाय करावा. दुग्धव्यवसायात असणाऱ्या स्पध्रेचा मुकाबला करण्यासाठी दर्जेदार दूध उत्पादनाची पद्धत राबवावी. तसेच तरुणांनी मुक्त गोठा पद्धतीचा अवलंब करून दुधव्यवसायात सक्रिय व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हा परिषदेने दिवंगत वसंतदादा पाटील सभागृहाचे दर्जेदार पद्धतीने नूतनीकरण केल्याबद्दल ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी समाधान व्यक्त केले. या सभागृहातून जिल्हा परिषदेच्या बठकांबरोबरच जिल्हा परिषद अधिकारी, सदस्य, कर्मचारी यांनाही प्रशिक्षण देण्याबाबतही पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले.
प्रारंभी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराज पाटील यांनी स्वागत करून प्रास्ताविकात जिलहा परिषदेच्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. याप्रसंगी कृषी व पशुसंवर्धन सभापती राजेंद्र माळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी जिल्हा पशुविकास अधिकारी डॉ. विश्वासराव मोरे यांनी आभार मानले.
समारंभास बांधकाम सभापती दत्तात्रय पाटील, समाज कल्याण सभापती किसनभाऊ जानकर, महिला व बालकल्याण सभापती वैशाली नाईक, पशुसंवर्धन उपसंचालक महेश बनसोडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शुभांगी पाटोळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अजय माने, कृषी विकास अधिकारी रघुनाथ भोसले, विशेष समाज कल्याण अधिकारी श्री. कवले यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य-सदस्या, अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jul 2014 रोजी प्रकाशित
दुग्धव्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा- जयंत पाटील
दुग्धव्यवसायात आíथक परिवर्तनाची मोठी ताकद असल्याने शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि नवनव्या पद्धतींचा अवलंब करून जिद्द आणि निष्ठेने दुग्धव्यवसायात पुढे यावे, असे आवाहन ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी केले.

First published on: 15-07-2014 at 02:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Use new technology in milk industry jayant patil