सातारा : सातारा जिल्ह्यातील नागरिकांसाठी यंदाचा गणेशोत्सव विशेष ठरणार आहे. पर्यावरण संवर्धन आणि जलसंपदा रक्षणाचा संदेश देत जिल्हा प्रशासनाने पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी व्यापक नियोजन केले आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १४२३ ग्रामपंचायतींमध्ये नैसर्गिक तळी व जुन्या पडक्या विहिरी, तर ४८८ विसर्जन कुंडांची निर्मिती करून जलप्रदूषणाला आळा घालण्याची सोय केली आहे. याशिवाय मूर्ती विसर्जनानंतर मूर्ती कुंभारांकडे सुपूर्द करण्याची व्यवस्था व २२१ ग्रामपंचायतींनी तयार केलेली कुंभारांची यादी हा उपक्रम अधिक परिणामकारक ठरणार आहे. निर्मल्याचे व्यवस्थापन हा उपक्रमाचा आणखी एक महत्त्वाचा भाग आहे.

१३५२ ग्रामपंचायतींमध्ये ट्रॅक्टर, २८० ग्रामपंचायतींमध्ये घंटागाड्या व निर्माल्य पेट्या उपलब्ध करून देण्यात आले आहेत. संकलित निर्मल्यापासून जैविक खत निर्मितीची प्रक्रिया १३६८ ग्रामपंचायतींमध्ये राबवली जाणार असून, हा उपक्रम कचऱ्यापासून संपत्ती निर्माण करण्याचा आदर्श ठरणार आहे, अशी माहिती स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने- भोसले यांनी दिली.

ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांनी या उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, ३ ते ६ सप्टेंबर (अनंत चतुर्दशी) या दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यावरणपूरक विसर्जन होणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी संपर्क अधिकारी नेमल्यामुळे कामाचा वेग व अंमलबजावणी अधिक सुकर होईल.

या उपक्रमात सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, युवक मंडळे, सामाजिक संस्था, महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि स्थानिक नागरिक एकत्र सहभागी होणार आहेत. लोकसहभागामुळे हा उत्सव खऱ्या अर्थाने लोकाभिमुख व यशस्वी ठरणार असल्याचा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी व्यक्त केला.

१४२३ ग्रामपंचायतींमध्ये नैसर्गिक तळी व जुन्या पडक्या विहिरी, तर ४८८ विसर्जन कुंडांची निर्मिती करून जलप्रदूषणाला आळा घालण्याची सोय केली आहे. याशिवाय मूर्ती विसर्जनानंतर मूर्ती कुंभारांकडे सुपूर्द करण्याची व्यवस्था व २२१ ग्रामपंचायतींनी तयार केलेली कुंभारांची यादी हा उपक्रम अधिक परिणामकारक ठरणार आहे. निर्मल्याचे व्यवस्थापन हा उपक्रमाचा आणखी एक महत्त्वाचा भाग आहे.

निर्मल्याचे योग्य संकलन करून पाण्याचे प्रदूषण टाळावे. पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करून भावी पिढ्यांसाठी शुद्ध, सुरक्षित आणि हरित वारसा जपावा. तयार करण्यात आलेल्या कृत्रिम कुंडांमध्येच मूर्तीचे विसर्जन करावे. या उपक्रमातून सातारा जिल्हा देशासाठी आदर्श ठरणार आहे. – संतोष पाटील, जिल्हाधिकारी, सातारा.