डॉक्टर तुम्ही सुद्धा!
प्रशांत देशमुख, वर्धा</strong>
समाजकार्य करताना राजकारण अस्पृश्य मानणाऱ्या वैद्यकीय जागृती मंचच्या अध्यक्षांनी भाजपकडे उमेदवारी मागत आता थेट निवडणुकीच्या आखाडय़ात उडी घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत असून, ‘डॉक्टर तुम्ही सुद्धा’ असा प्रश्न विचारला जात आहे.
मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे व डॉक्टर सहकाऱ्यांनी सहा वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या मंचने अनेक उपक्रम राबवले व त्यास भरभरून प्रतिसाद मिळाला. राजकारणविरहित कार्य सर्वाच्याच प्रशंसेस पात्र ठरले. आता पावडे यांनी विधानसभेसाठी भाजपकडे तिकीट मागितल्याने चर्चेला पेव फुटले आहे. मुलाखतीवेळी त्यांनी संघटनेच्या कामाचा आधार दिल्याने राजकीय उद्दिष्टासाठीच संघटना स्थापन केली काय, अशी विचारणा सहकारी करीत आहेत.
वैद्यकीय मंचने वॉटर कपच्या माध्यमातून जिल्हाभर जलसंवर्धनाची कामे केली. यामुळे आर्वी तालुक्यातील काकडधरा हे गाव प्रकाशझोतात आले. नंतर हनुमान टेकडीवरील वृक्षारोपण, पर्यावरणपूरक गणपती विसर्जन, डेंग्यू व अन्य रोगांबाबत जनजागृती, आरोग्यासाठी सायकल आदी उपक्रम केवळ पाच वर्षांत घेतल्याने यामागे राजकीय प्रवासाचे लक्ष्य असल्याची कुजबूज सुरू झाली. डॉ. पावडे यांनी हा आरोप फेटाळून लावत नाहक बदनामी केली जात असल्याचे स्पष्ट केले. आता हेच डॉक्टर भाजपच्या मांडवात उभे झाल्याने सामाजिक उपक्रम प्रश्नांकित झाले आहेत. मंचच्या उपक्रमास सामाजिक कार्य म्हणून मिळालेल्या प्रतिसादाच्या आधारे डॉक्टर आमदार व्हायला निघालेत, ही जनतेची फसवणूक नाही काय, असा प्रश्न केला जातो. कुटुंबात सात डॉक्टर असणाऱ्या पावडेंच्या संघटनेतील डॉक्टर, एक एक करत का सोडून गेले, याचे आत्मपरीक्षण करण्याचा सल्लाही दिला जातो.
भोयर विरोधकांची फूस
विद्यमान आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या पक्षांतील विरोधकांनी पावडेंना फूस दिल्याची चर्चा आहे. शहरात पक्षचिन्ह नसणारे मोठमोठे फ लक लागल्याने पावडेंनी अपक्ष म्हणून उभे राहण्याची तयारी केल्याचे बोलले जाते. काँग्रेस उमेदवारास पूरक म्हणून पावडेंना पुढे केल्याची चर्चा आहे. याबाबत पावडे म्हणाले की, भोयर यांना आमचा विरोध नाहीच. मात्र, पर्याय म्हणून उमेदवारी मागितली असून अपक्ष म्हणून उभे राहणार नाही. समाजकारणाला राजकारणाची जोड देण्याचा संघटनेचा प्रयत्न आहे.