Vaishnavi Hagawane वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात सासरा राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर नवरा शशांक, नणंद करीश्मा आणि सासू लता यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.१६ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवीने आत्महत्या केली. यामागे हुंड्यासाठीचा छळ, कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप आहेत. या प्रकरणात वैष्णवीचे सासरे आणि दीर हे दोघंही फरार झाले होते ज्यांना आठ दिवसांनी अटक करण्यात आली. आता या प्रकरणात वैष्णवीचा सासरा, दीर, नवरा, सासू आणि नणंद यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
१६ मे २०२५ ला काय घडलं?
पुण्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम येथे १६ मे २०२५ रोजी वैष्णवी शशांक हगवणे या २३ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. वैष्णवी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून होती. वैष्णवीच्या मृत्यूमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. वैष्णवीच्या माहेरच्यांनी आरोप केला आहे की, सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. लग्नाच्या वेळी ५१ तोळे सोने, एक फॉर्च्युनर कार आणि इतर महागड्या वस्तू दिल्या गेल्या होत्या. पण नंतरही वैष्णवीकडून आणखी पैशांची मागणी करण्यात आली आणि तिला घरातूनही बाहेर काढण्यात आलं होतं. वारंवार होणारा छळ सहन न झाल्याने तिने आत्महत्या केली.
वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेमविवाह
वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेमविवाह झाला होता. वैष्णवी आणि शशांक यांच्या लग्नाला वैष्णवीच्या घरातल्यांचा विरोध होता. तो विरोध पत्करुन वैष्णवीने लग्नाचा निर्णय घेतला. ज्यानंतर तिच्या घरातल्यांनी थाटात तिचं लग्न करुन दिलं होतं. मात्र शशांक वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला होता. वैष्णवीच्या वडिलांनी २०२३ मध्ये मुलगी वैष्णवी गरोदर असताना शशांकने तिच्यावर संशय घेतल्याचं म्हटलं होतं. पोलीस तक्रारही केली होती.
वैष्णवीचा पती राष्ट्रवादीतून निलंबित
वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचा पती शशांक याला राष्ट्रवादीतून निलंबित करण्यात आलं आहे. वैष्णवीचे सासरे पक्षाचे पदाधिकारी नाहीत. गुन्हेगारांना आम्ही पाठीशी घालणार नाही, अशी माहिती रूपाली चाकणकर यांनी दिली. वैष्णवी हगवणेचा मृत्यू दुर्दैवी आहे. याबाबत आमच्याकडे कोणतीही तक्रार नसताना स्वतः दखल घेऊन आम्ही याप्रकरणी कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. वैष्णवी हगवणेचे सासरे पक्षाचे पदाधिकारी नाहीत. वैष्णवीचे पती आमच्या पक्षाचे सदस्य होते मात्र त्यांना आम्ही निलंबित केले आहे, अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली.