कोल्हापूर : महादेवी उर्फ माधुरी हत्ती नांदणी मठाला परत देण्याची वनतारा पशुसंग्रहालयाची तयारी आहे. तेथे ‘वनतारा’च्या वतीने जागतिक दर्जाचे हत्ती पुनर्वसन केंद्र उभारण्यात येईल. याकरिता सर्वोच्च न्यायालयात नांदणी मठ, वनतारा व महाराष्ट्र शासन यांच्या वतीने पुनरावलोकन याचिका दाखल केली जाणार आहे, असे स्पष्टीकरण वनताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विहान करणी यांनी बुधवारी येथे केले.

नांदणी जैन मठातील महादेवी तथा माधुरी हत्ती हा न्यायालयाच्या आदेशानंतर गुजरात मधील वनतारा पशु संग्रहालयाकडे पाठवण्यात आला आहे. यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात वनतारा विरोधात संतप्त भावना व्यक्त होत आहेत. त्याचे व्यवस्थापन असलेल्या अंबानी उद्योग समूहाच्या उत्पादनांवर बहिष्कार घातला जात आहे. याची दखल घेऊन चार दिवसांपूर्वी वनताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विहान करणी हे कोल्हापुरात आले होते. त्यानंतरही कोल्हापुरात जनक्षोभ वाढत असल्याने ते आज पुन्हा कोल्हापुरात आले.

प्रारंभी त्यांनी नांदणी मठात जाऊन स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्याशी चर्चा करण्याचे ठरवले होते. मात्र सुरक्षेच्या कारणामुळे या नियोजनात बदल करण्यात आला. यानंतर कोल्हापुरातील दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये मठाधीश, विहान करणी, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार राहुल आवाडे, कृष्णराज महाडिक आदींमध्ये बंद दाराआड बैठक झाली.

यानंतर पत्रकारांशी बोलताना उभयतांनी भूमिका मांडली. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात नांदणी मठ, वनतारा व महाराष्ट्र शासन यांच्या वतीने पुनरावलोकन याचिका दाखल केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. ‘जय भवानी -जय शिवराय’ अशा शब्दात सुरुवात करत करणी म्हणाले, की नांदणी मठ,कोल्हापुरातील जनता यांना दुःख पोहोचवणे हा वनतारा, अनंत अंबानी यांचा उद्देश नव्हता. महादेवी हत्तीचे भले व्हावे हीच आमची भूमिका होती. यासाठीच नांदणी येथे वनताराच्यावतीने जागतिक दर्जाचे पुनर्वसन केंद्र उभारण्याची तयारी आहे. तक्रारदार पेटा व उच्च अधिकारी समिती यांना माधुरीचे भले कशात आहे हे पटवून देऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नांदणी मठाच्या जागेत वनताराकडून हत्ती पालन पोषण केंद्र सुरू करण्यात येईल. त्याची मालकी जिनसेन मठाकडे असेल तर वैद्यकीय सुविधा वनताराकडून पुरवल्या जातील. चर्चा समाधानकारक झाली आहे. वनतारा, अनंत अंबानी व परिवाराच्या भूमिकेला आशीर्वाद आहे. – स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी