परभणी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी हेक्टरी ५० हजार रुपये देण्यात यावेत, अशी मागणी आता जोर धरत असून विविध पक्ष, संघटना या संदर्भात आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. दरम्यान परभणीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीनेही तसा ठराव वार्षिक सर्वसाधारण सभेत घेतला असून तो शासनाकडे पाठवला आहे, तर याच मागणीसाठी पूर्णा येथे बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.
बाजार समितीच्या सभागृहात सभापती पंढरीनाथ घुले यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने ५० हजार रुपये हेक्टरी मदत करावी, असा ठराव या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. याशिवाय शेतकरी संघटना, सेलू तालुका दबाव गट, अशा विविध संघटनांनी ही मागणी केली आहे.
पूर्णा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा सोमवारी बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. मोठ्या प्रमाणात बैलगाड्या घेऊन शेतकरी सहभागी झाले होते. यामुळे पूर्णा-नांदेड रस्त्यावरील वाहतूक काही तास ठप्प झाली होती. हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची मागणी यावेळी प्रशासनाकडे शेतकऱ्यांनी केली. यावेळी शेतकऱ्यांनी संतप्त घोषणाबाजी केली. तहसीलदार माधवराव बोथीकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून शेतकऱ्यांच्या खात्यात मदत त्वरित द्यावी, तालुक्यात मुसळधार पावसामुळे कापूस, सोयाबीन, तूर, संत्रा व मोसंबी या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या पशुधनाचेही नुकसान झाले आहे त्यांनाही तातडीने अर्थसाह्य करावे अशी मागणी यावेळी केली. यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटनेतर्फे आंदोलने सुरू असून, शासनाने मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला. या निवेदनावर गोविंद जोशी, पंडितराव शिंदे, संपतराव कटारे, रामराव शिंदे, मदनराव शिंदे आदींसह अनेक शेतकऱ्यांनी स्वाक्षरी केली आहे.
प्रहारचे भीक मागो आंदोलन राज्यातील शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला असताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सरकारकडे पैसे नसल्याने कर्जमाफी करणे शक्य नाही असे वक्तव्य केले. या वक्तव्याचा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करीत संपूर्ण शहरामध्ये फेरी काढण्यात आली. या फेरीमध्ये प्रती व्यक्ती एक रुपया प्रमाणे भीक मागून पडत्या पावसात शहरात भीक मागो आंदोलन केले होते. यातून जमलेली चिल्लर प्रहारचे जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधने यांनी जिल्हा प्रशासनाला दिली.