वीर सावरकर मुद्द्यावर महाविकास आघाडीत फूट पडल्याच्या आरोपात कसलेही तथ्य नाही, ही आघाडी मजबूत आहे. प्रत्येक पक्षाचे आपले-आपले विचार असतात, प्रत्येकाला विचार मांडण्याचे स्वातंत्र आहे. लोकशाहीत संवाद महत्वाचा असतो, तो संवाद महाविकास आघाडीमध्ये आजही आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते पवन खेरा यांनी व्यक्त केली. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“भाजपाकडून सावरकरांचा मुद्दा देशातील ज्वलंत प्रश्नापासून जनतेचे लक्ष वळवण्यासाठी वापरला जात आहे. सावरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्याबद्दल जे लिखाण केले आहे, ते भाजपाला मान्य आहे का? याचं उत्तर द्यावं,” असा सवालही पवन खेरा यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा : “मी आधीच डॉक्टर झालोय, छोटीमोठी ऑपरेशन…”, डी. लीट पदवी मिळाल्यावर एकनाथ शिंदेंची फटकेबाजी
“अदाणी उद्योगसमुहात २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक कोणाची आहे? या गुंतवणुकीत चीनच्या एका नागरिकाचा समावेश आहे. तो चिनी नागरिक कोण? याची माहिती देशातील जनतेला झाली पाहिजे. म्हणूनच राहुल गांधी यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. अदाणी घोटाळ्याचं ‘दूध का दूध व पाणी का पाणी’, करायचे असेल, तर संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करुन चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. पण, मोदी सरकार या चौकशीला का घाबरत आहे?,” असा प्रश्न पवन खेरा यांनी विचारला आहे.
हेही वाचा : “आम्हाला मुका मार देता येतो, तुम्ही…”, संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ विधानावर टोला!
“अदाणी उद्योग समुहावर मोदी सरकार विशेष मेहरबानी दाखवत आहे. पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर जातात तेंव्हा अदानीही त्यांच्यासोबत असतात. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मोदींनी अदाणींना कंत्राट देण्यासाठी व एसबीआयकडून कर्ज देण्यासाठी मेहरबानी दाखवली. श्रीलंकेतील ऊर्जा क्षेत्राचे कंत्राट देण्यासाठी श्रीलंका सरकारवर मोदींनी दबाव टाकला. बांग्लादेशातील वीज पुरवठ्याचे कंत्राट अदानीला मिळावे यासाठी मोदींनी दबाव टाकला. एलआयसीच्या ३३ कोटी गुंतवणूकधारांचा पैसा अदानीच्या कंपनीत गुंतवण्यास भाग पाडले,” असेही पवन खेरा यांनी सांगितलं.