सांगली : महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर उंचावण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला असून याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कृती आराखड्याचा काय उपयोग झाला याची पडताळणी डिसेंबरमध्ये होणार असल्याने त्यावेळी याचा परिणाम समजणार असल्याचे आयुक्त तथा महापालिका प्रशासक शुभम गुप्ता यांनी सांगितले.महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या ५ हजार ३९८ विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर उंचावण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. यामध्ये २०२ शिक्षकांना सहभागी करून घेण्यात आले असून महापालिकेच्या ५१ शाळांमध्ये ९० दिवसांचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर सुधारण्यासाठी महापालिका शिक्षण विभाग आणि डाएट यांच्यावतीने अनुभवी शिक्षक व केंद्रसमन्वयक यांच्याशी चर्चा करून आराखडा तयार करण्यात येत आहे. बालवाडी ते तिसरी या वर्गाचा आराखडा तयार करण्यात आला असून यानुसार काम सुरू झाले आहे, तर चौथी ते आठवी वर्गाच्या आराखड्यावर सध्या काम सुरू आहे. इंग्रजी विषयासाठी सर्व वर्गासाठी अध्ययन स्तर तयार करण्यात येत असल्याचे आयुक्त गुप्ता यांनी सांगितले.एका स्तरावर घेतलेल्या चाचण्यांनुसार विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीनिहाय संपादणूक लक्षात घेऊन जे मूल अध्ययनात कमी आहे अशा मुलांना वेगळे करून त्यांची तयारी करून घेण्यासाठी अध्ययनस्तर कृती आराखडानुसार दिलेल्या कृतीच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना सराव देऊन त्यांचा अध्ययनस्तर वाढविण्यासाठी शिक्षक व मुख्याध्यापक यांना मार्गदर्शन व सूचना करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>Amol Mitkari : “सर्व ठरवून केलंय का?” कोसळलेल्या पुतळ्याबाबत अमोल मिटकरींचा प्रश्न; नेमका आरोप काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच ज्या विद्यार्थ्यांचा अध्ययनस्तरामध्ये वाढ झाली आहे त्या विद्यार्थ्यांची गणना वरील निकषामध्ये करण्यात येणार आहे. ९० दिवसांच्या कृती आराखड्याची अंमलबजावणी झाल्यानंतर २० डिसेंबर रोजी अंतिम पडताळणी केली जाणार आहे.या उपक्रमामध्ये उपायुक्त शिल्पा दरेकर, प्रशासन अधिकारी रंगराव आठवले, डाएटचे प्राचार्य व सर्व अधिव्याख्याता आदींचा समावेश करण्यात आला आहे.