विदर्भासाठी पुढील आठवडय़ात भले मोठे पॅकेज जाहीर केले जाणार असून अमरावतीमध्ये वस्त्रोद्योग पार्कसह अनेक उद्योग व प्रकल्पांची घोषणा होणार आहे. त्याचबरोबर विदर्भातील रस्ते ३१ जानेवारीपर्यंत खड्डेमुक्त करण्याचे विशेष अभियान हाती घेतले जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भातील असून हे हिवाळी अधिवेशन नागपूरला असल्याने विदर्भासाठी पॅकेज घोषित केले जाणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस त्याची घोषणा दोन-तीन दिवसांमध्ये करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
विदर्भातील अपूर्ण सिंचन प्रकल्प, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रकल्प यासह अनेक बाबींचा आढावा घेण्यात येत आहे. सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी पावले टाकण्यात येत आहेत. विदर्भात कापसाचे उत्पादन मोठे असूनही येथील ७५ टक्के कापूस अन्य ठिकाणी जातो. त्यामुळे शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ व्हावा, तसेच विदर्भात रोजगारनिर्मिती व्हावी, यासाठी विदर्भात अमरावतीजवळ खासगी वस्त्रोद्योग पार्क उभारण्यात येणार आहे.
उद्योजकांना काही सवलतीही दिल्या जातील. मिहान प्रकल्पातील अडचणी दूर करून तो मार्गी लावण्यात येत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यात लक्ष घातले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विदर्भातील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे अभियान हाती घेण्यात येत आहे. येथील रस्त्यांची दुरवस्था असून त्यांची आता डागडुजी केली जाणार आहे. राज्यात बहुसंख्य ठिकाणी रस्ते खड्डेमय आहेत; पण आता विदर्भाला विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Dec 2014 रोजी प्रकाशित
विदर्भासाठी पुढील आठवडय़ात पॅकेज
विदर्भासाठी पुढील आठवडय़ात भले मोठे पॅकेज जाहीर केले जाणार असून अमरावतीमध्ये वस्त्रोद्योग पार्कसह अनेक उद्योग व प्रकल्पांची घोषणा होणार आहे.

First published on: 15-12-2014 at 01:59 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidarbha likely to get package next week