वेगळया विदर्भाविरोधात भूमिका घेणाऱ्या मनसेसह शिवसेनेचा निषेध म्हणून विदर्भवाद्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे नागपूर येथे पोस्टर जाळले. विदर्भ सर्मथकांनी मंगळवारी मुंबई पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत मनसे कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून ती उधळून लावण्याचा प्रयत्न केला होता. त्याचेच हे पडसाद उमटल्याचे मानले जाते.
स्वतंत्र विदर्भाचे समर्थन करणाऱ्या अॅड. वामन चटप आणि डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांच्यातर्फे या पत्रकारपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही पत्रकारपरिषद सुरू असताना मनसेचे पालिकेतील गटनेते संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर यांच्या नेतृत्त्वाखालील मनसेचे कार्यकर्ते सभागृहात दाखल झाले. या कार्यकर्त्यांनी सभागृहात दाखल होत अखंड महाराष्ट्राच्या घोषणा देण्यास सुरूवात केली. या सर्व गोंधळामुळे पत्रकार परिषद बंद पडली. हा महाराष्ट्र अखंड राहावा ही सर्व मराठी जनतेची इच्छा आहे. त्यामुळे महाराष्ट्र तोडू पाहणाऱ्यांची पत्रकार परिषद उधळण्यात काहीही गैर नाही, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले. दरम्यान, मनसेच्या राड्यानंतर काही वेळाने विदर्भवादी नेत्यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेतली.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेली विदर्भवाद्यांची पत्रकार परिषद उधळल्यानंतर भाजप आमदार आशिष देशमुख यांनी राज ठाकरे यांना जाहीर आव्हान दिले आहे. मी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतो, राज ठाकरे यांच्यात हिंमत असल्यास त्यांनी काटोलमध्ये येऊन माझ्याविरुद्ध निवडणुकीत जिंकून दाखवावे, असे देशमुख यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांनी दुध का दुध आणि पानी का पानी करण्यासाठी काटोलमधून निवडणूक लढवावी. मी विदर्भाच्या बाजूने आणि त्यांनी महाराष्ट्राच्या बाजूने मैदानात उतरावे. त्यानंतर जनताच योग्य ते उत्तर देईल, असे आशिष देशमुख यांनी म्हटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidarbhavadi worker burns raj thackeray uddhav thackerays poster
First published on: 14-09-2016 at 14:29 IST