मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तीन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्याला नाशिकमधून सुरुवात झाली. नाशिककडे जाताना पडघा, शहापूर आणि इगतपुरी येथे त्यांच्या स्वागताचे कार्यक्रम पार पडले. नाशिकमध्ये घोटी टोल नाक्यापासूनच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यानंतर शहरातील पाथर्डी फाटा येथे त्यांना भव्य हार घालून शहरात त्यांचे स्वागत करण्यात आले.
यानंतर एकनाथ शिंदेंनी पाथर्डी फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन केले. मुंबई नाका येथे हजारो लोकांनी रात्री १२ वाजता त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.
व्हिडीओ पाहा :
शनिवारी (३० जुलै) मुख्यमंत्री मालेगाव आणि नाशिक या शहरांबाबत आढावा बैठक घेऊन या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत.
मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा जलील यांचा इशारा, अब्दुल सत्तारांचं प्रत्युत्तर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते शिवसेनेच्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. शिंदे आगामी काळात औरंगाबाद दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यादरम्यान आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवू, असा इशारा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे. या इशाऱ्यानंतर आता शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांनी जलील यांच्यावर पलटवार केला आहे. तुम्ही काळे झेंडे दाखवले तर एकनाथ शिंदे त्यांना सरळ करतील, असे सत्तार म्हणाले आहेत.
“सरकारला कायदा, नियम तसेच धोरण ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे. कायद्यानुसार इतर तसेच आपल्या देशात शहरांचे नामांतर झालेले आहे. एकदा कायद्याने मंजुरी दिली तर औरंगाबादच्या नामकरणाला कोणतीही अडचण येणार नाही. झेंडे कुठे आणि कसे दाखवायचे हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र त्यांनी काळे झेंडे दाखवले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दांडे त्यांना सरळ करतील,” असा पलटवार अब्दुल सत्तार यांनी केला आहे.
हेही वाचा >> “…मला चिंता वाटतेय” न्यायालयाच्या ‘त्या’ इशाऱ्यानंतर ओबीसी आरक्षणावर शरद पवारांचे विधान
इम्तियाज जलील काय म्हणाले होते?
खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले. “मुख्यमंत्र्यांचे स्वागत काळे झेंडे दाखवून करणार आहोत. बसून चर्चा करुयात असे मला पोलिसांनी सांगितले होते. मात्र काही प्रश्न हे बसून नव्हे तर रस्त्यावर उतरुन सोडवले जातात. औरंगाबादच्या नामकरणाचा विषय आहे. तसे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, या दोन कारणांमुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार आहोत. सर्वपक्षीय समितीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे,” असे इम्तियाज जलील यांनी सांगितले.