Vijay Shivtare On Mahayuti Politics : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला. तसेच महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर आता महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे. सरकार स्थापन करण्यासाठी सध्या महायुतीच्या नेत्यांमध्ये हालचाली सुरु आहेत. मात्र, २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्यानंतर आज जवळपास पाच दिवस झाले आहेत. मात्र, अद्यापही राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही. सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरु आहेत. पण अद्याप ठोस कोणताही निर्णय झालेला नाही.

काळजीवाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदावर दावा केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, त्यानंतर पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे यांनी भाजपाचे दिल्लीतील नेते जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल अशी भूमिका जाहीर केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील आपलीही अशाच प्रकारची भूमिका असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे भाजपाचा मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झालं. मात्र, भाजपामध्ये नेमकी मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत अद्याप नाव जाहीर करण्यात आलेलं नाही.

हेही वाचा : निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीत बिघाडी? थेट काँग्रेसचं नाव घेऊन ठाकरेंच्या नेत्याची टीका!

तसेच मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव चर्चेत आहे. पण यावर अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री नेमकं कोण होणार? याची अनेकांना उत्सुकता लागलेली आहे. दरम्यान, या सर्व घडामोडींवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. आता शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी भाष्य करत अजित पवारांना मुख्यमंत्रिपदावरून डीवचलं आहे. ‘मुख्यमंत्री पद नशिबात असावं लागतं’, असं म्हणत विजय शिवतारे यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विजय शिवतारे काय म्हणाले?

“एकनाथ शिंदे हे आजही काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत. जे निर्णय वरिष्ठ घेतील त्या निर्णयानुसार वागणे अशा प्रकारचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. राहिली गोष्ट अजित पवारांची, तर प्रत्येक पक्षातील नेत्यांना आणि आमदारांना वाटत असतं की आपला नेता सर्वोच्च पदावर जावा. पण ते इथे (कपाळाकडे बोट दाखवत) असावं लागतं”, असं म्हणत मुख्यमंत्रिपद हे नशिबात असावं लागतं असं अप्रत्यक्ष म्हणत विजय शिवतारे यांनी अजित पवारांना डिवचलं आहे. ते टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलत होते.