Vijay Wadettiwar Remark on Laxman Hake’s Viral Call Recording : ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांची फोनवरील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. यामध्ये एका तरुणाने हाके यांना त्यांच्या सामाजिक कार्यात योगदान म्हणून पैसे देऊ केले. लक्ष्मण हाके यांनी देखील ते पैसे स्वीकारण्यास सहमती दर्शवली. ते म्हणाले. “मी बँक खात्यावर पैस घेत नाही. मुळात माझ्याकडे बँक खातं नाही. मी यूपीआय वापरत नाही. तसेच हाके यांनी पैसे देऊ करणाऱ्या तरुणाला त्यांच्या कार चालकाचा यूपीआय लिंक्ड फोन नंबर देऊ केला आणि त्या नंबरवर पैसे पाठवण्यास सुचवलं. यावर तरुणाने हाके यांना शिवीगाळ केली.

लक्ष्मण हाके त्या तरुणाला म्हणाले, “मी दिलेल्या यूपीआय नंबरवर तुम्ही पैसे पाठवू शकता. कारण हा आपल्या मित्राचाच नंबर आहे. किती रुपये पाठवताय?” यावर तरुणाने लक्ष्मण हाके यांना शिवीगाळ केली आणि ‘सामाजिक कार्याच्या नावाखाली पैसे घेताना लाज कशी वाटत नाही?’ असा प्रश्न विचारला. या फोन कॉलचं रेकॉर्डिंग सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. यावर हाके यांनी काही वेळापूर्वी खुलासा केला. ते म्हणाले, “माझ्या हेतूवर प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा ज्याने मला फोन केला होता त्याचा हेतू पाहा. केवळ मला व माझ्या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी तो कॉल आला होता आणि त्याचं रेकॉर्डिंग व्हायरल केलं गेलं.”

विजय वडेट्टीवारांकडून हाकेंची पाठराखण

दरम्यान, पैशांशिवाय आंदोलनं होतात का? असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी लक्ष्मण हाके यांची पाठराखण केली आहे. तसेच आतापर्यंत इतकी आंदोलनं झाली आहेत ती पैशांशिवाय झाली आहेत का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

विजय वडेट्टीवार म्हणाले, “एक ओबीसी कार्यकर्ता, नेता राज्यभर फिरतोय. लक्ष्मण हाके या तरुणाला सगळीकडे सभेसाठी बोलावलं जात आहे. एखादा कार्यकर्ता समाजासाठी काम करत असतो तेव्हा लोकांना वाटतं की आण त्याला मदत करुया. एखादा माणूस म्हणतो की मला तुमची मदत करायची आहे. अशा वेळी कोण नाही म्हणणार? कोण मदत नाकारणार? मदत नाकारली नाही यात काय वाईट आहे? लक्ष्मण हाकेने पैसे मागितले का? त्याला समोरून ज्या नालायकाने फोन केला त्याच्या हेतूवर संशय घ्यायला हवा. त्या नालायकाने लक्ष्मण हाकेला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं आहे का? आतापर्यंती जी आंदोलनं झाली ती फुकट झाली आहेत का? एवढी आंदोलनं झाली त्यांनी पैसे घेतले नाहीत का? बाकीच्या लोकांनी पैशांशिवाय आंदोलनं केली का?