Vijay Wadettiwar on Indus water going towards Pakistan : काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात तणावाचं वातावरण आहे. हा हल्ला म्हणजे केंद्र सरकार व गुप्तचर यंत्रणा देशाला सुरक्षा पुरवण्यात सपशेल अपयशी ठरल्याचं उदाहरण असल्याची टीका विरोधक करत आहेत. दरम्यान, दहशतवाद्यांना खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानविरोधात केंद्र सरकार आक्रमक झालं आहे. भारताने उभय देशांमधील सिंधू जलकरार स्थगित केला आहे. तर, भाजपा व त्यांच्या मित्रपक्षांमधील नेते पाकिस्तानचं पाणी बंद करण्याबाबत वक्तव्ये करत आहेत. मात्र, पाकिस्तानचं पाणी बंद करायला केंद्र सरकारला २० वर्षे लागतील असं वक्तव्य काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या प्रसारमाध्यमांसमोर म्हणाले होते की “भारत-पाकिस्तान युद्ध होऊ नये”. त्यावर भाजपाने पलटवार करत म्हटलं की “हे लोक (काँग्रेस) पाकिस्तानची भाषा बोलू लागले आहेत”. त्यावर विजय वडेट्टीवार म्हणाले, “तुमची (मोदी सरकार) युद्ध करायची तयारी असेल तर करा. पाकिस्तानने तर थेट युद्धाचं आव्हान केलं आहे”.

“एका मुख्यमंत्र्याच्या बोलण्याने पंतप्रधानाची भाषा बदलते का?”

काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले, “एखादे मुख्यमंत्री काहीतरी म्हणाले म्हणून पंतप्रधानांची भाषा बदलू शकते का? ठीक आहे, सिद्धरामय्या म्हणाले असतील की युद्ध नको. परंतु, तुमची (केंद्र सरकार) युद्धाची तयारी आहे का? तुमची युद्धाची तयारी असेल तर तुम्ही युद्ध करा. पाकिस्तानने युद्धाचं खुलं आव्हान दिलं आहे. तुम्ही लोक समझोत्याची भाषा करता तेव्हा ती कोणाची भाषा असते? ती पाकिस्तानची भाषा असते का? उभय देशांमध्ये आज काय स्थिती आहे पाहा. हे जुनंच युद्ध आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तानचं पाणी बंद करायला २० वर्षे लागतील : वडेट्टीवार

काँग्रेसचे आमदार म्हणाले, “युद्ध कोणाच्या फायद्याचं असतं का? युद्धाने केवळ मोठं नुकसान होतं. तुम्ही काहीही बोलता आणि पसरवता. तुम्ही लोक पाकिस्तानचं पाणी बंद करायची भाषा करता. अरे तुम्हाला पाकिस्तानचं पाणी बंद करायला २० वर्षे लागतील. ते पाणी अडवण्यासाठी नद्यांवर धरणं बांधावी लागतील. हे लोक केवळ लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी, त्यांना भरकटवण्यासाठी काहीही बाता मारत आहेत.”