Vijay Wadettiwar महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हनी ट्रॅप प्रकरण चर्चेत आलं आहे. नाना पटोले यांनी या संदर्भातला आरोप केला होता. प्रफुल लोढा प्रकरणाचीही चर्चा होते आहे. आता या प्रकरणात अनेक लोक अडकले आहेत असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. कोणत्याही पक्षाचा माणूस असो त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असंही विजय वडेट्टीवार म्हणाले.
हनी ट्रॅपचं खूप मोठं रॅकेट आहे-विजय वडेट्टीवार
हनी ट्रॅपचं खूप मोठं रॅकेट आहे. त्यात अनेक मोठे मासे अडकले आहेत. साधारण ५० तरी मंत्री आणि अधिकारी यात अडकले आहेत. हनी ट्रॅपमधे मोठे अधिकारी, मंत्री, राजकारणातले अनेक आजी-माजी मंत्री यामध्ये आहेत. ज्याचं नाव पुढे आलं तो लोढा याने अनेकांकडून पैसे घेतले आहेत. त्याने किमान २०० कोटींची वसुली केली आहे असा आरोप विजय वडेट्टीवार म्हणाले. तो कुणाचा कार्यकर्ता आहे हे मी बोलणार नाही. पण या सगळ्या प्रकरणाचा खुलासा लवकर होईल. जे झाकलेले चेहरे आहेत ते समोर येतील असंही विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.
मागील आठवड्यात नाना पटोलेंनी आणला होता पेन ड्राईव्ह
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मागील आठवड्यात विधानसभेच्या पटलावर मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनीट्रॅपचं केंद्र झाल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी एक पेन ड्राईव्हही सभागृहात दाखवला होता. विधानसभा अध्यक्षांनी सरकारला हनीट्रॅपच्या मुद्यावर निवेदन करण्यास सांगितलं. पण त्यांच्या सूचनेनंतरही सरकारनं त्यावर निवेदन केलं नाही. ना हनी आहे ना ट्रॅप. आमच्यापर्यंत नाना पटोलेंचे बॉम्ब पोहोचलेच नाहीत असं सांगत त्यांनी या आरोपांची खिल्ली उडवली होती. आता विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा याच प्रकरणाचा उल्लेख करत हनीट्रॅपमध्ये बडे मासे अडकले आहेत असा आरोप केला आहे.
सूरज चव्हाणबाबत काय म्हणाले वडेट्टीवार?
सूरज चव्हाण याने ज्या छावाच्या कार्यकर्त्याला मारलं त्याच्यावर कारवाई करताना पोलिसांना वेळ लागतो आहे. सूरज चव्हाणने जे केलं त्याचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं समर्थन आहे असाच अर्थ होतो. अशा प्रकराच्या कृतीला समर्थन आहे का ते मुख्यमंत्र्यांनी सांगावं किंवा सूरज चव्हाणला अटक करावी. अशीही मागणी विजय वडेट्टीवार केली आहे.
या सरकारला थोडी जरी लाज शरम असेल…
या सरकारला थोडी जरी लाज शरम असेल तर माणिकराव कोकाटेंवर कारवाई होईल. शेतकऱ्यांना आणि सरकारला भिकारी म्हणणाऱ्या, सभागृहात रमी खेळणाऱ्या माणसावर कारवाई केली जाईल. माणिकराव कोकाटेंना एक मिनिटही त्या पदावर ठेवू नये अशी आमची मागणी आहे. सरकारला शेतकऱ्यांबाबत प्रेम, कळवळा असेल तर त्यांनी त्वरित कारवाई केली पाहिजे अशीही मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. या सरकारला शेतकऱ्यांच्या भावनांशी देणं घेणं नाही, असे वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्राला पाठीशी घालणार आहे का? रमी खेळणारा मंत्री कृषी मंत्री आहे असं आम्ही सांगू का? असा संतप्त सवाल हि विजय वडेट्टीवार यांनी केलाय. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्त्यव्यावर ते बोलत होते.