Vijay Wadettiwar On Chandrashekhar Bawankule : राज्याच्या राजकारणात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना काँग्रेसला फोडा, काँग्रेस रिकामी करा असा कानमंत्रच दिला. याबाबत एक ऑडिओही व्हायरल झाली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या विधानानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपावर जोरदार टीका केली.

आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी यावरून भाजपाला थेट इशारा दिला आहे. ‘आज तुमचे दिवस आहेत, पण उद्या आमचेही दिवस येतील. हम भी चुन चुन कर बदला लेंगे’, असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या विधानावरून भाजपाला इशारा दिला आहे. ते काँग्रेसच्या सद्भावना रॅलीत बोलत होते.

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

“सद्भावना रॅलीच्या माध्यमातून दुभंगलेली मने जोडण्याचं काम करण्यात येत आहे. जी दरी निर्माण झालेली आहे, ती दरी मिटवण्याचं काम सद्भावना रॅलीच करू शकेल. या सद्भावना रॅलीच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र खंबीर उभा आहे. या देशात आणि राज्यात जातीयतेचं आणि धर्मांधतेचे विष मोठ्या प्रमाणात पेरल्या जात आहे. त्यांना हे नाही कळत की विकासाचं राजकारण करून यश मिळवता येईल. त्यामुळे भाजपा अशा प्रकारचं राजकारण करून स्वत:ची राजकीय पोळी भाजण्याचं काम भाजपा करत आहे”, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

“राज्यातील राजकीय परिस्थितीवर कोणी म्हणतंय की काँग्रेसला फोडा, काही नेते गेले, आता कार्यकर्त्यांना फोडण्याचं काम करा असं म्हणतात. मात्र, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पक्षाला दुसऱ्यांची घरे फोडण्याची सवयच लागली आहे. पण हे लक्षात ठेवा, राजकारणात सर्वांचं घर काचेचं असतं. आज तुमचे दिवस आहेत, उद्या आमचेही दिवस येतील. तेव्हा हम भी चुन चुन कर बदला लेंगे”, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.