Vijay Wadettiwar on Vaishnavi Hagawane Suicide Case : काँग्रेस नेते व आमदार विजय वडेट्टीवार यांनी आज (२५ मे) पुण्यात जाऊन वैष्णवी हगवणे हिच्या पालकांची म्हणजेच कसपटे कुटुंबियांची भेट घेतली. त्यांनतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वैष्णवीचा छळ करणाऱ्या तिच्या सासू-सासऱ्यांना व इतर कुटुंबियांना भर चौकात फाशी देण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी हगवणे कुटुंबाचा राक्षसी लोक असा उल्लेख केला आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले, “मी वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणातील काही पुरावे, फोटो पाहिले, ते पाहून एवढंच वाटतंय की हे हगवणे कुटुंब राक्षसी आहे. ही माणसं नाहीत, मानवतेला काळीमा फासण्याचं कृत्य या नालायक कुटुंबाने केलं आहे. वैष्णवीला त्यांनी मारहाण केली होती. नऊ महिन्यांचं बाळ पदरात असताना कोणीही आत्महत्या करू शकत नाही. त्यामुळे तिला ठार मारलंय असंच आमचं मत आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास करावा”.
“या राक्षसी कुटुंबाला भर चौकात फाशी द्यायला हवी”
काँग्रेस आमदार म्हणाले, “या राक्षसी कुटुंबाला भर चौकात फाशी दिली पाहिजे असं माझं मत आहे. हे लोक त्याच लायकीचे आहेत. यांना सोडता कामा नये. यांच्याबद्दल माफ करण्याची, सहानुभूतीची भावना दाखवायची गरज नाही. असे गुन्हे करणारे लोक राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रात काम करणारे असले तर अशा प्रवृत्तीला ठेचलंच पाहिजे”.
ही हत्याच आहे : वडेट्टीवार
विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “पैशासाठी होणाऱ्या सासरच्या छळामुळे आत्महत्या केलेल्या वैष्णवी हगवणे हिचे आई-वडील आणि कस्पटे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. वैष्णवीच्या आई वडिलांच्या वेदना आज शब्दांत मांडता येण्यासारख्या नाहीत. वैष्णवीच्या शरीरावर आढळलेल्या जखमांवरून हे स्पष्ट होते की ही आत्महत्या नसून सरळसरळ हत्या आहे. इतकी गंभीर घटना घडून सुद्धा पोलीस कारवाई संथ गतीने सुरू आहे, हे अत्यंत दुःखद आहे”.
वडेट्टीवारांकडून न्यायाची मागणी
वडेट्टीवार म्हणाले, “राज्य महिला आयोगाने स्वतःहून कारवाईस पुढाकार न घेणे हे महाराष्ट्रासाठी खरोखर लज्जास्पद आहे. सरकारने तातडीने या प्रकरणात लक्ष देऊन वैष्णवी, तिचं ९ महिन्यांचं बाळ आणि कस्पटे कुटुंबाला न्याय द्यावा ही सरकारकडे मागणी आहे”.
