माजी पर्यावरणमंत्री आणि शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते रामदास कदम यांचे पुत्र सिद्धेश कदम यांची राज्य सरकारने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या (MPCB) अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. नियमांनुसार पर्यावरण संरक्षणाशी संबंधित क्षेत्रांमध्ये २५ वर्षांपेक्षा जास्त काळ योगदान देणाऱ्या किंवा पर्यावरण संरक्षणासाठी काम करणाऱ्या संस्था/संघटनेत २५ वर्षांपेक्षा अधिक काळ काम केलेल्या व्यक्तीची या पदावर नियुक्ती केली जाते. त्यामुळे सिद्धेश कदम यांनी पर्यावरणाच्या क्षेत्रात खरंच इतकं योगदान दिलं आहे का? असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात आहेत. राज्य सरकाने नियम धाब्यावर बसवून ही नियुक्ती केल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

विजय वडेट्टीवार यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील नाराज नेत्यांच्या मुलांना खुश ठेवण्यासाठी लॉलीपॉप वाटप! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी रामदास कदम यांचे सुपुत्र सिद्धेश कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियम डावलून ही नियुक्ती करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. जागा वाटपावरून गेले काही दिवस रामदास कदम भाजपावर टीका करत आहेत आणि आता त्यांच्या मुलाची प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करून लॉलीपॉप देण्याचा हा प्रयत्न दिसत आहे. लोकसभा जागांच्या बदल्यात भाजपा शिंदे गट आणि अजित पवार गटातील नाराज नेत्यांना सरकारी पदं वाटून सेटलमेंट करण्यासाठी ही शासकीय पदे आहेत का?

सिद्धेश कदम यांचे वडील रामदास कदम हे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार आणि भाजपावर नाराज असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून ते सातत्याने भाजपाविरोधात वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे रामदास कदम यांची नाराजी दूर करण्यासाठीच त्यांच्या मुलाला हे पद दिलं असल्याचं बोललं जात होतं. दरम्यान, वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे की, नाराज नेत्यांच्या मुलांना लॉलीपॉप देऊन नेत्यांची बोळवण केली जात आहे.

हे ही वाचा >> “एकनाथ शिंदेंमुळे तुम्ही…”, शिंदे गटाचा फडणवीसांवर पलटवार; म्हणाले, “उठाव केला नसता तर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

MPCB च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यासाठीचे नियम काय?

पर्यावरण संरक्षणाशी संबंधित क्षेत्रांत २५ वर्षाहून अधिक काळ काम केलेल्या व्यक्तीची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली जाऊ शकते. तसेच एखाद्या शासकीय अधिकाऱ्याची या पदावर नियुक्ती करायची असेल तर त्या अधिकाऱ्याने सचिव किंवा त्यापेक्षा वरिष्ठ पदावर काम केलेलं असायला हवं. शिंदे-फडणवीस सरकारने सहा मार्च रोजी एक अधिसूचना जारी करून आयएएस अधिकारी ए. एल. जरहाद यांना एमपीसीबीच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं. त्यांच्या जागी आता सिद्धेश कदम यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. जरहाद हे गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्या कार्यालयात गेले नाहीत, असं कारण सरकारने दिलं आहे. ७ सप्टेंबर २०२१ पासून ते या पदावर काम करत होते. दी इंडियन एक्सप्रेसने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.