राहाता : सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२५ व्या जयंती दिन सोहळा व साहित्य पुरस्कार वितरण उद्या (दि. ८) रोजी प्रवरानगर येथील डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात होणार असल्याची माहिती पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांनी दिली.

केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. मिलींद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही साहित्य कलागौरव पुरस्काराने दहा साहित्यिकांना गौरविण्यात येणार आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून प्रवरा परिवाराने साहित्य, नाट्य आणि कला क्षेत्रातील व्यक्तिंना विठ्ठलराव विखे पाटील यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या पुरस्काराने गौरविण्याची परंपरा सुरू केली. पुरस्कार देण्याचे यंदाचे हे ३५ वे वर्ष आहे. प्रवरा परिवाराने अखंडितपणे या पुरस्कारांची परपंरा राखली असून, यंदाचे हे वर्ष पद्मश्रींच्या जयंतीचे शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्ष असल्याने यंदाच्या पुरस्कार वितरण सोहळ्याचे महत्त्व विशेष असल्याचे त्यांनी सांगितले.

सहकार चळवळीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या विचारांमुळे सहकार क्षेत्राने केलेली प्रगती आणि या चळवळीला प्राप्त झालेले सामाजिक पाठबळ विचारात घेवून यंदाचे वर्ष हे युनेस्कोने अंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले. या सोहळ्यास सहकार चळवळीतील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रवरा परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

‘भूमिपुत्र’चे प्रकाशन

सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२५ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून १९७७ साली प्रथम प्रकाशित झालेल्या त्यांच्या भूमिपुत्र ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. लेखक राजा मंगळवेढेकर यांनी शब्दबद्ध केलेला आणि माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांची प्रस्तावना असलेला भूमिपुत्र हा ग्रंथ पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जीवनाच्या वाटचालीवर प्रकाशझोत टाकणारा आहे. नव्या पिढीला संपूर्ण सहकार चळवळीची वाटचाल आणि पद्मश्रींच्या व्यक्तिमत्वाची माहिती व्हावी म्हणून हा ग्रंथ पुन्हा नव्या स्वरुपात प्रकाशित करण्याचा निर्णय प्रवरा परिवाराने घेतला.