सांगली : मिरज तालुक्यातील शक्तिपीठ महामार्ग मोजणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय बुधगाव (ता. मिरज) येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तसा ग्रामसभेत ठरावही करण्यात आल्याचे महेश खराडे यांनी सांगितले.
बुधगाव येथे शक्तिपीठ बाधित शेतकरी बचाव कृती समितीच्या पुढाकाराने बैठकीचे आयोजन हनुमान मंदिरात बुधवारी करण्यात आले होते. रत्नागिरी नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग उपलब्ध असताना समांतर महामार्गाची गरजच नाही. तशी मागणीही कोणी केली नाही. असे असताना जमीन अधिगृहण करून महामार्ग कशासाठी, असा सवाल करत खराडे म्हणाले, या महामार्गामुळे जमिनीचे दोन भाग होणार आहेत. तसेच बुधगाव ते दानोळी हा १५ किलोमीटरचा पूल बांधला जाणार आहे. या पुलाच्या भरावामुळे सांगलीसह अनेक गावे उद्ध्वस्त होण्याची भीती आहे.
कॉम्रेड उमेश देशमुख म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग कंत्राटदारांना पोसण्यासाठीच आहे. जमीन मोजणीसाठी कुणी आले तर शेतकरी वेगळा विचार करतील, असा इशाराही त्यांनी दिला. बैठकीत मनोहर पाटील, बाळासाहेब पाटील, दिनकर साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पी. एम. पाटील, प्रवीण पाटील, अधिक पाटील, सचिन पाटील, धनाजी पाटील, अमर पाटील, सयाजी कदम, बाळू पाटील, रामदास गुरव, नीलेश बाबर, अनिल कोकाटे आदिंसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, या मागणीसाठी सोमवार दि. २८ जुलै रोजी मिरजेतील प्रांत कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात येणार असल्याचे शेतकरी संघर्ष समितीने जाहीर केले. भाई दिगंबर कांबळे व भूषण गुरव यांनी सांगितले की, काही शेतकऱ्यांनी समर्थन दिल्याचे सांगून प्रशासनाकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याला बळी पडून आंदोलन थांबवले जाणार नाही तर अधिक तीव्रतेने हा लढा सुरूच राहील.