‘‘शेतक ऱ्यांच्या मागण्यांसाठी गावागावांत जाऊन आंदोलने केली, मात्र आता यापुढे आंदोलन न करता सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षनेत्यांना ‘गावबंदी’ करून त्यांना जाब विचारू,’’ अशी घोषणा शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी केली.
शेतक ऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली होती. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. त्यात शरद जोशी यांच्यासह शेकडो शेतक ऱ्यांना अटक करून नंतर सोडून देण्यात आले. या वेळी पत्रकारांशी बोलताना शरद जोशी म्हणाले, ‘‘आजपर्यंत शेतक ऱ्यांच्या प्रश्नांवर अनेक आंदोलने केली, मात्र आता प्रकृ ती अस्वास्थ्यामुळे आंदोलनाला येणे मला जमणार नाही. शेतक ऱ्यांची अवस्था आज फारच गंभीर झाली आहे. आजच्या आंदोलनाला शेतकरी येतील की नाही, अशी शंका होती, मात्र गावागावांतून शेतकरी स्वखर्चाने आले आहेत. शेतकरी संघटना यापुढे पुढाऱ्यांना गावबंदी आंदोलन करेल. प्रत्येक राजकीय पक्षाचा नेता गावात आला की, त्यांना शेतक ऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन देऊन जाब विचारला जाईल. जोपर्यंत शेतक ऱ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत त्यांना गावबंदी करा आणि भाषणे करू देऊ नका,’’ असे आवाहन त्यांनी शेतक ऱ्यांना केले.

मुख्यमंत्र्यांनी शेतकरीहिताचे निर्णय घ्यावेत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षात असताना शेतक ऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे, अशी घोषणा केली होती. आता ते मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांनी तात्काळ शेतक ऱ्यांच्या मागण्या मान्य करून त्यांना न्याय द्यावा. सरकारने शेतक ऱ्यांना न्याय द्या, अन्यथा यापुढे निवडणुका झाल्यानंतर भाजपला सत्तेपासून रोखण्यात शेतकरी महत्त्वाची भूमिका बजावतील, असा इशारा शरद जोशी यांनी दिला.  

फडणवीस यांच्याशी रामगिरीवर झालेल्या चर्चेतून काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे आज त्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या मदतीने राज्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. केंद्रात भाजपचे सरकार असल्याने अडचण येणार नाही, असा विश्वास आहे.
– शरद जोशी