लोकसभा अन् विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी मातब्बर नेतेमंडळी हेलिकॉप्टरद्वारे भ्रमंती करताना पाहावयास मिळतात. तथापि, सरपंचपदाच्या निवडणुकीत सदस्यांचे अपहरण टाळण्यासाठी जर हेलिकॉप्टरचा वापर झाला तर आश्चर्य वाटणे स्वाभाविकच. इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावच्या सरपंचपदी विराजमान होण्याकरिता ही शक्कल लढविली गेली. या निवडणुकीच्या निमित्ताने सदस्यांना हवाई सफरीचा तर आनंद मिळालाच, शिवाय आदिवासी तालुक्यातील ग्रामस्थांना थेट हेलिकॉप्टर प्रथमच पाहण्याचाही योग आला. मुंबई-आग्रा महामार्गावरील इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी शिवसेनेचे चंद्रकांत गतीर यांनी सदस्यांना सहलीवर नेले होते. राजस्थानमधील ही सहल आटोपून गतीर यांच्यासह सात सदस्य रविवारी मुंबईला दाखल झाले. मुंबईहून भाडेतत्त्वावर खासगी हेलिकॉप्टर घेऊन सोमवारी सकाळी ते ऐन मतदानाच्या दिवशी म्हणजे सोमवारी मुंढेगावात दाखल झाले. सदस्यांना हेलिकॉप्टरने आणण्याचे नियोजन गतीर यांनी आधीच केले होते. ११ सदस्यांच्या या ग्रामपंचायतीत सात सदस्य गतीर यांच्या गटाचे होते तर उर्वरित चार विरोधी गटाचे. मतदाना वेळी रस्तेमार्गाने आल्यास सदस्यांची पळवापळवी होण्याची शक्यता असल्याने सदस्यांना हेलिकॉप्टरने आणण्याचा पर्याय निवडल्याची प्रतिक्रिया गतीर यांनी दिली.