रत्नागिरी : मरणानंतरही मयताचे हाल होण्याचा प्रकार संगमेश्वर तालुक्यात घडल्याचा प्रकार पहावयास मिळाला आहे. संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील वाणीवाडी बाजारपेठ भागातील पारंपरिक स्मशानभूमीकडे जाण्यासाठी मार्गच नसल्याने ग्रामस्थांनी मानवी साखळी करुन भर पाण्यातून वाट काढत मृतदेह तिरडी वरुन स्मशानभूमीत नेला.
कडवई येथील ग्रामस्थांना अंत्यविधीसाठी अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागली आहे. गेली तब्बल सत्तर वर्षे विकासापासून वंचित राहिलेल्या या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी मार्गच नसल्याने आता ग्रामस्थांनी या विरोधात आक्रमक पवित्रा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
संगमेश्वर कडवई वाणीवाडी, बाजारपेठ आणि समर्थनगर भागाच्या ग्रामस्थांना अंत्यविधीसाठी कडवई तुरळ मार्गालगत नदीपलीकडील स्मशानभूमीचा वापर करावा लागतो. मात्र या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते. विशेषतः पावसाळ्यामध्ये मोठ्या पाण्यातून मृतदेह नेण्यासाठी तरुणांना मानवी साखळी करावी लागते. यावेळी अनेकदा ग्रामस्थ पाण्याच्या प्रवाहात वाहून जाण्याची भीती ही निर्माण होत असते.
या स्मशानभूमीच्या जागेचा वाद काही काळ न्यायालयात प्रलंबित होता. आता ग्रामस्थांनी सामोपचाराने हा वाद निकाली काढला आहे. तरीदेखील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी योग्य रस्ता आणि पूल नसल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.
मात्र मागील अनेक वर्षांपासून ग्रामस्थांनी प्रशासनाकडे रस्ता आणि पूल बांधकामासाठी पत्रव्यवहार केला होता. या प्रस्तावाला न्यायालयीन प्रकरण असल्याचे सांगून प्रस्तावावर आज तागायत कोणताच निर्णय झाला नाही. मात्र आता हा न्यायालयीन वाद दूर झाला असल्याने प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन रस्ता व पूल उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.