रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा नियोजनच्या निधी वाटपावरुन सत्ताधारी पक्षांच्या आजी माजी आमदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे. या निधी वाटपा वरुन भाजपचे माजी आमदार डॉ. विनय नातू पालकमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. जिल्ह्यातील फक्त दोन तालुक्यात जास्त निधी दिला जात असल्याचा आरोप नातू यांनी केला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा नियोजन समिती मार्फत दोन तालुक्यातील काढलेल्या कामामध्ये अनियमितता असल्याने याला जबाबदार असणा-या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी भाजपाचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी केली आहे.
याविषयी बोलताना नातू म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीमधुन सन २०२४/२५ या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या तांडावस्ती विकास योजनेचा आढावा घेतला असता, सन २०२४/२५ मध्ये १ कोटी १० लाख रूपये निधीची प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यापैकी राजापूर विधानसभा ९६ लाख, चिपळूण विधानसभा १५ लाख निधी वितरीत करण्यात आला.
नेहमी प्रमाणे झुकते माप एखाद्या मतदार संघाला द्यायचे आणि बाकी मतदारसंघांना उपेक्षित ठेवायचे आणि हे सर्व कंत्राटदारांचे भल्ले करण्यासाठी केले जात असल्याचे माजी आमदार नातू यांनी सांगितले. ते म्हणाले की, दि. २६/३/२०२५ ला प्रशासकीय मान्यता देत दि. ३१/३/२०२५ ला ७० लाख निधी खर्च झाला आहे. इतके प्रगतशील कामकाज या विभागाकडून सुरु आहे. या कामांची निवीदा काढली कधी? मंजुरी दिली कधी? याची चौकशी करून प्रत्येक विषयात कोणत्या ना कोणत्या अधिकाऱ्याला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आपली असल्याचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी सांगितले आहे.
रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या या निधी वाटपा वरुन सत्ताधारी आजी – माजी आमदारांमध्ये खडाजंगी सुरु झाली आहे. मागील काही दिवसांपासून पालकमंत्री उदय सामंत व भाजपाचे माजी आमदार विनय नातू यांच्यात यांच्यात असलेले वाद आता उघड उघड समोर येवू लागले आहेत.
डॉ. विनय नातू हे महायुतीतील नेते आहेत. त्यांना जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरुन काही शंका असेल तर त्यांनी आपल्या बरोबर चर्चा करावी. निधी वाटपात कोणतीही तफावत नाही. – उदय सामंत, पालकमंत्री रत्नागिरी.