केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी २४ ऑक्टोबरला राजकारणातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती. यामुळे कोकणासह महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. पण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केल्यानंतर निलेश राणेंनी आपली निवृत्ती मागे घेतली. यातच आता खासदार विनायक राऊत यांनी निलेश राणेंना लक्ष्य केलं आहे.

“निलेश राणेंनी राजकीय निवृत्ती घेऊ नये. पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरावं. मग, पराभव काय असतो, ते दाखवतो,” असं आव्हान विनायक राऊतांनी निलेश राणेंना दिलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

हेही वाचा : उलटा चष्मा: औटघटकेचे नाट्य

विनायक राऊत म्हणाले, “राजकीय नाटक कसं करायचं, हे राणे कुटुंबाकडून शिकूव घ्यावं. एकीकडे नारायण राणेंनी निलेश राणेंना फटकारलं आहे. तर, दुसरीकडे नितेश राणेंनी निलेश राणेंना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कोकण दौऱ्यात आले असताना निलेश राणेंना कुठं स्थान मिळालं, हे सर्व लोकांनी पाहिलं आहे.”

“फडणवीसांनी सांगितल्यामुळे निलेश राणेंनी वळवळ चालू केली आहे. पण, ही फार दिवस चालणार नाही. निलेश राणेंनी राजकारणातून निवृत्ती घेऊ नये. पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरावं. पराभव काय असतो, ते दाखवतो,” असं आव्हान विनायक राऊतांनी निलेश राणेंना दिलं आहे.

हेही वाचा : राजकीय कोंडीतून सुटकेसाठी नीलेश राणेंचा राजसंन्यास?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निलेश राणे काय म्हणाले होते?

निलेश राणे यांनी ‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर निवृत्तीची घोषणा केली होती. “नमस्कार, मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या १९/२० वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. भाजपामध्ये खूप प्रेम भेटलं. भाजपासारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी खूप नशीबवान आहे,” असं निलेश राणे म्हणाले होते.