ज्या शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे वीजबील थकीत आहे, अशा शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम महावितरणकडून हाती घेण्यात आली होती. या मुद्यावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनीही देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली आहे. फडणवीस हे भाजपाची ही रंग बदलणारी राजकीय औलाद असून त्यांच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे, असे ते म्हणाले. टीव्ही ९ वृत्तवाहिनीला त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – “राज्यपालांचे महाराष्ट्रावर प्रेम, पण अनेक वेळा…”; शिवरायांबाबत केलेल्या विधानावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

”महाविकास आघाडीचे सरकार असताना देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचे बील माफ करावे, शेतकऱ्यांकडून बील वसूल करू नये, अशी मागणी केली होती. मात्र, आता सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांकडून वीजबील वसूल करावेच लागेल, अन्यथा पर्याय नाही, अशा प्रकारची भूमिका घेत आहेत. त्यामुळे शेतकरी खूप संतापले आहे. ही भाजपाची ही रंग बदलणारी राजकीय औलाद आहे. त्यांच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे”, अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिली आहे.

हेही वाचा – “मोठे पप्पू आत्ताच महाराष्ट्रातून गेले, आता दुसरे पप्पू…”, शरद पवारांचा उल्लेख करत नवनीत राणांची टीका

दरम्यान, यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनीही या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला होता. सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांचा जुना व्हिडिओ ट्वीट करत आता मध्यप्रदेश पॅटर्ननुसार शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली होती.

”विरोधात असताना तत्कालिन विरोधी पक्षनेते व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्य प्रदेश पॅटर्नचे कौतुक करीत वीजबील वसूलीला विरोध केला होता. आता ते सत्तेत आहेत, त्यांच्याकडे अर्थखातेदेखील आहे. त्यांनी आता मध्यप्रदेश पॅटर्ननुसार शेतकऱ्यांना दिलासा द्यावा”, असे त्या म्हणल्या होत्या.