पंढरपूर : आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रखुमाईचे ‘व्हीआयपी’ दर्शन पास दिल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाईचा इशारा सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला आहे. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी , उपविभागीय पोलीस अधिकारी यांना याबाबत त्यांनी पत्राद्वारे आदेश दिला आहे. या निर्णयाचे भाविकांनी स्वागत केले आहे.

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंत्री, आमदार, खासदार, अधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने ‘व्हीआयपी’ पास घेऊन दर्शन घेतात. परिणामी दर्शनरांगेतील भाविकांना मात्र तासन् तास थांबावे लागते. यामध्ये अनेकजण मंत्री किंवा अन्य लोकप्रतिनिधींची शिपारस घेऊनही ‘व्हीआयपी’ म्हणून शरकाव करतात. यामुळे सामान्य भाविकांना मात्र दर्शनासाठी तिष्ठत राहावे लागते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेत वरील आदेश काढला आहे.

पंढरीत आषाढी यात्रा काळात रोज हजारो भाविक पंढरीत दाखल होत असतात. एकादशीच्या आसपास तर ही संख्या लाखोंच्या घरात जाते. गर्दीमुळे भाविकांना दर्शनासाठी अनेक तास रांगेत उभे राहावे लागते. त्यातच ‘व्हीआयपी’, ओळखीने दर्शन घेणाऱ्या भाविकांमुळे दर्शनासाठी तिष्ठत राहण्याचा काळ वाढतो. हे होऊ नये यासाठी या यात्रा काळात ‘व्हीआयपी’ दर्शन सेवा बंद केली जाते. तरीही अनेकदा मंत्री, आमदार, खासदार, अधिकारी, राजकीय कार्यकर्ते हे थेट प्रवेश देण्याची मागणी, विनंती करतात. प्रसंगी दबाव टाकतात. यातून अनेकदा वादाचे प्रसंगही घडत, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न तयार होतात. हा विचार करूनच राज्य शासनाच्या विधी व न्याय खात्याने २०१० मध्येच याबाबत निर्णय घेतलेला आहे. या निर्णयानुसार, सण-उत्सव व यात्रा काळातील प्रमुख दिवसांत विशेष दर्शन व्यवस्थेस मनाई केलेली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी वरील आदेश काढला आहे. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांना याबाबत त्यांनी पत्राद्वारे आदेश दिला असून असा प्रकार घडल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आषाढी यात्रेच्या काळात लाखो भाविक येत असतात. यामध्ये सामान्य भाविकांना दर्शनासाठी खूप वेळ रांगेत थांबावे लागते. सामान्य भाविक तिष्ठत असताना, त्यांना त्रास सहन करावा लागत असताना अशा गर्दीच्या काळात अनेकजण त्यांच्या सोबतच्या लोकांसह ‘व्हीआयपी’ दर्शन पास घेत मध्येच घुसतात. हा प्रकार सामान्य भाविकांवर अन्याय करणारा तर असतोच शिवाय यातून कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न तयार होऊ शकतात. यामुळेच हा आदेश दिला असून याचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. – कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी, सोलापूर