आम्ही हिंदू आहोत, याचा आम्हाला ठाम विश्वास हवा. या धर्माला कोणी संस्थापक नाही म्हणून हा सनातन धर्म आहे. इतर धर्माना संस्थापक असल्याने व त्यांना काळाची मर्यादा आहे, पण हिंदूधर्माला काळाची मर्यादा नाही म्हणून तो सनातन आहे. या देशातील नागरिकांबाबत विविध प्रवाद पसरविले जात आहेत, पण ते खोटे आहेत. आम्ही गुणांचे पूजक असल्याने आर्य आहोत. वेदांपासून सृष्टीला प्रारंभ झाला असल्याने आम्ही वैदिक आहोत आणि या सर्वाचे एक नाव म्हणून आम्ही हिंदू आहोत, असे प्रतिपादन स्वामी गोविंदगिरीजी महाराज यांनी सोमवारी येथे केले.
विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेला ५० वष्रे पूर्ण झाल्याने सुवर्ण जयंती महोत्सवात येथील भारत विद्यालयाच्या प्रांगणावर हिंदू संमेलन झाले. त्यात ते बोलत होते. सर्वधर्मसमभाव हा आपला स्वभाव आहे, पण सर्व धर्म समान नाहीत, असे सांगून ते म्हणाले की, आपला धर्म कधीच इतरांच्या कत्तली करा, त्यांना फसवा, अत्याचार करा व मारा, असे सांगत नाही. भारताबाहेर निर्माण झालेले धर्म मात्र चक्क दुसऱ्या धर्माच्या लोकांना क्रुरपणे मारण्यास, फसवणूक करण्यास, अत्याचार करण्यास, तसेच आमिष दाखविण्यास सांगतो म्हणून सर्व धर्म समान नाहीत.
आधीच्या सरकारने टार्गेटेड व्हायोलन्स कायदा आणण्याचा घाट घातला होता. हा कायदा अल्पसंख्यकांना खूश करण्यासाठी, त्यांचे लांगूलचालन करण्यासाठी व हिंदूंना पुन्हा गुलाम करण्यासाठी होता. त्याचे प्रारूप बघितल्यावर त्यातील भयंकर धोका कळला व नंतर देशातील साऱ्या साधुसंतांनी आपल्या वैयक्तिक साधना बाजूला ठेवून देशभर जागरण केल्याने आज अच्छे दिन आले आहेत.
जगात केवळ सज्जनतेचा विजय कधीच होत नसतो. त्याला शक्ती व सावधानतेची गरज आहे. सर्वधर्मसमभाव हा खुळा शब्द आहे व तो राजकारण्यांनी आणला आहे. त्यावर विश्वास ठेवू नका. देशात होणारे घरवापसीचे कार्यक्रम योग्यच आहेत. हिंदूंना आपले संख्याबळही वाढवावे लागेल. कारण, येथे एकेका मताला किंमत आहे.
हिंदूंचे संख्याबळ कमी झाल्यास भवितव्य राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. या प्रसंगी प्रशांत हरताळकर, भंते आनंद बोधी, अंजलीताई देशकर, ज्ञानेश्वर महाराज वाघ, मधुकरराव सराफ यांनीही विचार मांडले.
प्रास्ताविक संजय रोहणकर यांनी, तर सूरज भगेवार यांनी एकात्मता मंत्र म्हंटला. खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, महापौर उज्ज्वला देशमुख, उपमहापौर विनोद मापारी आदी अनेक उपस्थित होते.
वाईट वृत्ती सहन करू नका -सुधांशू महाराज
भारताचे योग व ध्यान हे साऱ्या जगात पोहोचले आहे. जगाने त्याचा आता स्वीकार केला आहे. अमेरिकेने शांती, प्रेम, धर्म हे सारे गमावले आहे व भारतच त्यांना हे सर्व देऊ शकतो, असे सांगून सुधांशू महाराज म्हणाले की, आम्ही सहनशील वृत्तीचे लोक आहोत म्हणून वाईट वृत्तीचे लोक वाढले आहेत असल्याचे ते म्हणाले.