गृहस्थाश्रमीचे जीवन जगताना वडीलधारे या नात्याने तुमचे ‘मत’ काय, हा प्रश्न त्यांना कधी कोणी विचारला नाही. उपेक्षितपणाचा कटू इतिहास पचवून दाहक वर्तमानाशी त्यांनी जुळवून घेतले आणि वृद्धाश्रमातील सामाजिक जीवनात ते समरस झाले. पण आता आयुष्याच्या संध्याकाळी खरेखुरे ‘मत’ देण्यास ते सज्ज झाले आहेत. तब्बल ५० ज्येष्ठ नागरिक अशा प्रकारे नव्याने मतदानाला सामोरे जात आहेत.
मातोश्री वृद्धाश्रमातील ६५पैकी ५० ज्येष्ठांना मध्यंतरी दुरापास्त झालेले ‘मत’दानाचे भाग्य पुन्हा प्राप्त झाले. प्रशासनाच्या पुढाकारातून मतदानाची संधी त्यांना मिळाली. सोलापूर, उस्मानाबाद, परभणी, बीड, नांदेड, सातारा, लातूर, बीदर आदी जिल्हय़ांतील वृद्ध या वृद्धाश्रमात वास्तव्यास आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना मतदानाची संधी मिळावी, यासाठी व्यवस्थापक धनाजी तोडकर यांनी लक्ष घातले. आर्वी गावचे तलाठी, सरपंच, ग्रामसेवक व तहसीलदार महेश शेवाळे यांनी या कामी सहकार्य केले. ६५पकी ५०जणांची नावे नव्याने आर्वी गावच्या मतदारयादीत समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे या ५०जणांना वृद्धाश्रमातला पहिलावहिला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. उर्वरित १५जण मात्र गरहजर राहिल्याने त्यांची नावे यादीत समाविष्ट करता आली नाहीत. २४ पुरुष व २६ महिलांचा या ५०जणांमध्ये समावेश आहे.
मातोश्री वृद्धाश्रमापासून आर्वी गावच्या पुण्यश्लोक अहल्यादेवी माध्यमिक शाळेतील मतदान केंद्राचे अंतर अडीच किलोमीटरच्या आसपास आहे. सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी वृद्धाश्रमाने वाहन व्यवस्था केली. सर्वच मतदार ६५ वर्षांपेक्षा अधिक वयोमानाचे आहेत. वृद्धाश्रमात राहणारे सुखदेव दौलतराव जामकर (वय १०५) व त्यांची पत्नी तान्हूबाई (वय १००) याही आता मतदानाचा हक्क बजावणार आहेत. वृद्धाश्रमात राहण्याची वेळ आल्याने आपला मतदानाचा हक्कही आता कायमचा संपला, असे आपल्याला वाटत होते. मात्र, वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक धनाजी तोडकर यांच्या प्रयत्नामुळे मतदानाची संधी मिळत असल्याबद्दल वृद्धाश्रमातील आजी-आजोबांनी आनंद व्यक्त केला.
संग्रहित लेख, दिनांक 17th Apr 2014 रोजी प्रकाशित
आयुष्याच्या संध्याकाळी ‘मत’दानाचा ‘भाग्योदय’!
गृहस्थाश्रमीचे जीवन जगताना वडीलधारे या नात्याने तुमचे ‘मत’ काय, हा प्रश्न त्यांना कधी कोणी विचारला नाही. उपेक्षितपणाचा कटू इतिहास पचवून दाहक वर्तमानाशी त्यांनी जुळवून घेतले आणि वृद्धाश्रमातील सामाजिक जीवनात ते समरस झाले.
First published on: 17-04-2014 at 01:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Voting chance to 50 old hermitage