सातारा: कोरेगावच्या उत्तर भागात खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक अशी ओळख असणाऱ्या वाघ्या घेवडा पीक काढणीला सुरुवात झाली आहे. पावसाची उसंत मिळताच शेतकऱ्यांनी घेवडा काढणीसह मळणीसाठी लगबग सुरू आहे. सध्या ६५ रुपये किलो प्रमाणे दर मिळत असला, तरी सततच्या पावसामुळे यंदा उत्पादनात घट झाली आहे. आणखी नुकसान टाळण्यासाठी शेतकरी काढणी करत आहेत.
खरीप हंगामातील घेवडा पिकाचे आगार म्हणून या परिसराची ओळख आहे. हलका मध्यम पाऊस दमट वातावरण यामुळे घेवडा पिकाला या परिसरात पोषक वातावरण असते. यंदा पेरणीपासूनच सतत पाऊस असल्याने जमिनीतील ओल घटत नाही. ओलसरपणा आणि पावसाची रिमझिम यामुळे घेवड्याची वाढ झाली. मात्र उन्हाच्या अभावामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढला. पीक वाढीला लागताना कीड पडल्यामुळे पाने पिवळी पडली, तसेच शेंगांची वाढ खुंटली. आगाप पिकास मोठा फटका बसला आहे. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गेल्या पंधरवड्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे काढणीला आलेला घेवड्याच्या शेंगांना कोंब फुटले. पीक खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.
मागास पीक चांगले असले तरी त्याच्या सुगीला अद्याप पंधरा दिवसांचा अवधी आहे. दरम्यान परतीचा पाऊस सुरू होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे पीक पदरात पडेपर्यंत शेतकऱ्यांची काळजी वाढली आहे. त्यामुळे घेवडा काढणीची लगबग सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा बीड जिल्ह्यातून बहुतांश मजूर घेवडा काढणीला परिसरात दाखल झाले आहेत. त्या सोबत स्थानिक मजुरांमुळे यंदा सुगी लवकर होण्यास मदत होणार आहे. काढणी करताना पावसाने उघडीप दिली तर शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. मात्र ढगाळ वातावरण आणि उन्हाच्या अभावामुळे सुगी लांबण्याचा अंदाज आहे.
शेंगा पक्व झाल्या असल्या तरी डहाळे हिरवेगार आहेत. डहाळे पूर्णपणे वाळल्यावरच काढणी सोपे जाते. काढणीला सध्या तीन हजार रुपये प्रति एकर दर घेतला जात आहे. मात्र पावसाळी वातावरण राहिल्यास मजुरांकडून दरात वाढ केली जाईल. त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. पाऊस वाढल्यास नुकसान होऊ नये म्हणून काढणीची लगबग सुरू आहे. मात्र ओल्या शेंगा ही बाजारात मोठ्या प्रमाणात विकण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.
सततच्या पावसामुळे घेवड्याच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम झाला आहे. ओलसरपणामुळे काढलेल्या घेवढ्याला बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची भीती असते. त्यामुळे वातावरणात उन्हाची गरज आहे. सद्य:स्थितीत घेवड्याच्या मालाला गुणवत्तेनुसार प्रतिकिलो ६५ रुपये दर मिळत आहे. – रेवरसिद्ध महाजन, व्यापारी