वाई येथील कोविडं रुग्णालयात उपचार सुरु असणाऱ्या रुग्णाने आजाराला कंटाळून व नैराश्यातून रुग्णालयातील डॉक्टर व आरोग्य सेविकेला धक्काबुक्की व मारहाण करत पळून जाऊन, कृष्णा नदी पात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संचित कोविडं रुग्णालयानजीक आज दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाचवड (ता. वाई) येथील ६५ वर्षे वयाचा एक व्यक्ती चार दिवसांपूर्वी करोनाबाधीत असल्याचे आढळून आले होते. त्यांना वाई येथील संचित कोविडं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होत होती. शनिवारी रात्री त्यांनी मुलाला फोन करून माझी प्रकृती उत्तम आहे मला आता घरी घेऊन जा, असे म्हटले होते. मात्र त्यांना करोना आजारामुळे नैराश्यं आले होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्येचा विचारही बोलून दाखवला होता. अखेरीस आज पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास त्यांनी रुग्णालयातून कृत्रिम प्राणवायूची यंत्रणा (ऑक्सिजन)काढून फेकून देत, आरोग्य सेविका व डॉक्टरांना धक्काबुक्की करून पळ काढला.  यावेळी डॉक्टर आरोग्य सेविका कर्मचाऱ्यांनी पीपीई किट घातलेली असल्याने त्यांना या रुग्णामागे पळता आले नाही. दरम्यान, डॉ.विद्याधर घोटवडेकर यांना  ही माहिती समजल्यानंतर त्यांनी ताबडतोब  रात्रगस्ती वरील पोलिसांच्या मदतीने या रुग्णास  पकडून रुग्णालयात आणले व त्यांना समजूत घालून विश्राती घेण्याचा सल्ला दिला.  शिवाय, या प्रकाराची नातेवाईकांना देखील कल्पना देण्यात आली.

पुढील उपचारासाठी त्यांना बेडला बँडेज पट्टीच्या साहाय्याने बांधण्यात आले होते. मात्र, आपल्याला करोना झाला आहे याचेच त्यांना फार वाईट वाटत होते. त्यांनी रुग्णालयाकडे घरी सोडण्याची मागणी केली होती. मात्र उपचार व इंजेक्शनचा डोस पूर्ण होईपर्यंत त्यांना घरी सोडणे शक्य नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. दोनतीन दिवसांनी त्यांना घरी सोडण्यात येणार होते.

दरम्यान आज दुपारी त्यांनी पुन्हा कृत्रिम वायू (ऑक्सिजन) यंत्रणा काढून टाकली. त्यावेळी रुग्णालयातील डॉक्टरांनी व सेविकांना त्यांना प्रतिबंध केला असता त्यांनी स्वतःच्या ताकदीने बँडेज पट्ट्या तोडून खाटेवरून उठून डॉक्टर व सेविकेला धक्काबुक्की व मारहाण करून संरक्षक दरवाजा तोडून रुग्णालयातून पळ काढला व लगतच्या कृष्णा नदी पात्रात उडी मारली. डॉ.घोटवडेकर व सहकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना नदी पात्रातून बाहेर काढून रुग्णालयातील कोविड अतिदक्षता विभागात आणले. परंतु त्यांच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. यावेळी गणपती घाटावर सिरीयलचे चित्रकरण सुरु असल्याने गर्दी होती.मात्र त्यांना कोणीही उडी मारण्यापासून रोखले नाही आणि नंतर पाण्यातून काढतानाही कोणी मदत केली नाही. या ठिकाणी केवळ बघ्यांची गर्दी जमा झाली होती. या घटनेची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wai patient commits suicide by jumping into a river due to coronas depression msr
First published on: 06-09-2020 at 19:39 IST