शेतीमालास रास्तभाव मिळावेत, या प्रमुख मागणीसाठी लातूर येथून निघालेली शेतकरी ‘पायी दिंडी’ सोमवारी औरंगाबाद येथे पोहचणार आहे. प्रामुख्याने बीड लोकसभा मतदारसंघाची राजकीय मशागत करत औरंगाबाद येथे सोमवारी दिंडी समारोपाच्या कार्यक्रमात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह व खासदार गोपीनाथ मुंडे सहभागी होणार आहेत.
१९ दिवसांच्या या दिंडीत भारतीय जनता पक्षातील प्रमुख व्यक्तींनी हजेरी लावली. दिंडी’चे १० मुक्काम बीड जिल्ह्यात होते. दोन लातूर जिल्ह्यात, एक जालना तर औरंगाबाद जिल्ह्यात दोन ठिकाणी दिंडीचा मुक्काम होता. चालत सहभागी झालेल्या नेत्यांनी कापूस व सोयाबीनसाठी रास्तभाव मिळावा, हा मुद्दा प्रामुख्याने मांडला. शेती प्रश्नांची मांडणी सोप्या भाषेत करत असल्याने या दिंडीस चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा माजी आमदार पाशा पटेल यांनी केला.