दिगंबर शिंदे,  लोकसत्ता 

सांगली : मिरज शहराला वैद्यकीय पंढरी म्हणून ओळख मिळवून देणारे सव्वाशे वर्षे रात्रंदिवस रुग्णसेवा देणारे वॉन्लेस रूग्णालय अखेरची घटका मोजत आहे. साडेचारशे खाटांची सुविधा, अत्याधुनिक वैद्यकीय साधने, प्रशस्त इमारत असतानाही गैरव्यवस्थापनामुळे हे रुग्णालय सध्या रुग्ण शय्येवर असून मिरजेची शान असलेले हे रुग्णालय पुन्हा एकदा दिमाखात सुरू व्हावे यासाठी कोणीही फारसे प्रयत्न करीत नाही.

१२९ वर्षांपूर्वी मिरजेत सर विल्यम वॉन्लेस यांनी रुग्णालयाची उभारणी केली. याठिकाणी सर्व उपचारासाठी स्वतंत्र विभाग कार्यरत असून एकेकाळी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी या रुग्णालयाचा करार होता. मिरज वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या बहुसंख्य वैद्यकतज्ज्ञांनी मिरजेतील रुग्णालयात रुग्णसेवेचे प्राथमिक धडे गिरवले, अभ्यासले आहेत. याच ठिकाणी असाध्य आजारावरील शस्त्रक्रिया करण्याचे प्रायोगिक ज्ञान आत्मसात केले.

पश्चिम महाराष्ट्रामध्ये विविध आजारावर उपचार एकाच छताखाली केले जाणारे हे रुग्णालय उत्तर कर्नाटकपासून सांगलीसह सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरीपर्यंतच्या रुग्णांचा अंतिम उपचार केंद्र होते. कालपरवापर्यंत ग्रामीण भागात थोरला दवाखाना म्हणून या रुग्णालयाची ओळख होती. आजही ओळख पुसट होत चालली आहे असे म्हणण्यापेक्षा इतिहासजमा होत चालली आहे. रुग्णालयात अनेक रुग्णसेवेसाठी तत्पर असले तरी गेल्या दोन वर्षांपासून रुग्णालयात वेळेवर वेतन मिळणे कठीण झाले आहे. गेले दीड महिना वेतनासाठी चतुर्थ वर्गातील कर्मचारी रुग्णालयाच्या दारात आंदोलन करीत आहेत. मात्र, या रुग्णालयाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सध्यातरी कोणताच पर्याय व्यवस्थापनासमोर उरलेला दिसत नाही. यामुळे रुग्णालयात काम करणारे सर्वजण अस्वस्थ तर आहेतच, पण मिरजेचे भूषण म्हणून ओळख असलेले रुग्णालय अतिदक्षता विभागात अंतिम आचके देत असल्याचे दु:खही आहे. आजच्या घडीला रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन, पाणी पट्टी, वीज बील आदीची सुमारे ३२ कोटींची देणी थकित आहेत. महिन्याकाठी  कर्मचाऱ्यांच्या वेतनावर दीड ते दोन कोटींचा खर्च करावा लागतो. या खर्चाची तोंडमिळवणी कशी करायची याची चिंता व्यवस्थापनासमोर असली तरी पर्याय सध्या तरी काही नाही. यामुळे ४५० खाटांच्या या रुग्णालयात आंतररुग्ण विभागात हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत.

अत्याधुनिक यंत्रणा हाताशी असल्याने रुग्णांना विविध तपासण्या करण्यासाठी इतरत्र हलवावे लागत नाही.  बहुसंख्य वेळा अनेक खासगी रुग्णालयात रुग्णाची अवस्था चिंताजनक झाल्यानंतर वॉन्लेस रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला जात होता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये ज्या पद्धतीने विविध आजारावर उपचार करण्याची सुविधा असते त्याच प्रमाणे या ठिकाणीही सोय आहे. अलीकडच्या काळात बहुविध उपचार केंद्राच्या नावाखाली सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू झाली आहेत. अशा पद्धतीचे शतकापूर्वी रुग्णालय मिरजेत चालू करण्यात आले. आता ते शेवटची घटका मोजत आहे.

महात्मा गांधी १९२७ मध्ये निपाणी दौऱ्यावर असताना ह्दयविकाराचा त्रास सुरू होताच अवघ्या अडीच तासात जाऊन यशस्वी उपचार करणाऱ्या सर विल्यम वान्लेस यांनी ४ जुलै १८९४ मध्ये या रुग्णालयाची मुहुर्तमेढ रोवली. याच रुग्णालयात उपचार घेत असताना क्रांती सिंह नाना पाटील, मराठीतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे वि.स. खांडेकर यांचा अखेरचा श्वास याच रुग्णालयात घेतला, तर छत्रपती शाहू महाराज, बालगंधर्व, नाटय़ाचार्य गोिवद बाळ देवल, पंडिता मनोरमाबाई यांच्यावर या रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनीही रुग्ण नातेवाईकाची विचारपूस करण्यासाठी या रुग्णालयास भेट दिली होती.

या रुग्णालयाने अनेक रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्याचे काम केले आहे. या रुग्णालयामुळे अनेक व्यावसायिकांची चूल चालते. मिशन रुग्णालय हे मिरजेच्या गौरवाचे स्थान असून तंतुवाद्याप्रमाणेच मिरजेची रुग्णसेवा ख्यातकीर्त आहे ही अबाधित राहावी यासाठीच रुग्णालयाच्या विश्वस्त संस्थेनेच पुढाकार घेऊन पर्यायांचा विचार केला तर आमचे सहकार्य राहील. 

शिवाजी दुर्वे, नगरसेवक.

रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे सर विल्यम वॉन्लेस यांचे तत्त्व होते. याच भावनेतून कर्मचारी काम करीत आले आहेत. मात्र गैरव्यवस्थापनामुळे आज बिकट अवस्था झाली आहे. याला संचालकांसह वरिष्ठ व्यवस्थापन अधिकारी जबाबदार आहेत. रुग्णालय पुन्हा दिमाखात सुरू राहावे यासाठी कर्मचारीही योगदान द्यायला तयार आहेत, मात्र, चर्चेसाठी व्यवस्थापनाने पुढे येण्याची गरज आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजू लोंढे, कर्मचारी.