कराड : पुणे- बंगळूरू महामार्गावरील कराड शहरातून जाणाऱ्या वारुंजी ते नांदलापूर अशा सुमारे पावणेपाच किलोमीटरच्या एक खांबी (सिंगल पिलर) सहापदरी युनिक उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात पोहचले असून, ९२ खांबांवर १ हजार २२३ आरसीसी भाग (सेंगमेंट) बसविण्यात आल्याने दीर्घकाळ रखडलेला हा बहुचर्चित उड्डाणपूल लवकरच वाहतुकीस खुला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीने हाल सोसणाऱ्या वाहनचालक, प्रवाशी व स्थानिक नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

कराडजवळील तासन् तास वाहतूककोंडीचे प्रमुख कारण ठरलेल्या या उड्डाणपुलाच्या कामास ऑक्टोबर २०२३ मध्ये सुरुवात झाली. पुढे दोन टप्प्यांत हे काम सुरू झाले. पहिल्या टप्प्यात हॉटेल ग्रीन पार्क ते ढेबेवाडी फाटा, तर दुसऱ्या टप्प्यात नोव्हेंबर २०२३ पासून ढेबेवाडी फाटा ते कोल्हापूर नाका या भागात काम पार पडले. पुलामध्ये ४० मीटरचे ७४, ३१ मीटरचे ६ आणि ३० मीटरचे ११ आरसीसी गाळे असून, प्रत्येक गाळ्यात सरासरी ११ ते १४ आरसीसी भाग बसवले गेले आहेत. आता फक्त अतिक्रमणामुळे सेवा रस्त्याचे व उड्डाणपुलाच्या भरावाचे काम रखडले आहे. त्यामुळे हे सर्व अडथळे दूर होऊन हा उड्डाणपूल सेवेत रुजू होण्याची प्रतीक्षा राहिली आहे.

हे संपूर्ण भाग बसविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आता पुलावरील उर्वरित कामे करण्यास सुरुवात करण्यात आल्याने आता हा दीर्घकाळ रेंगाळलेला उड्डाणपूल लवकरच सुरू होण्यास सज्ज असल्याचे दिसत आहे. दरम्यान, धोंडेवाडीतील कास्टिंग यार्डवरून हे आरसीसी भाग आणून ते बसवण्यात सुरक्षा कामगार आणि सुरक्षारक्षकांनी गेले दोन वर्षे कष्ट घेतले आहेत. हा भव्य उड्डाणपूल उभारण्यास अनेकदा मुदतवाढ घ्यावी लागली. ठेकेदार, पोटठेकेदार आणि संबंधित प्रशासनाचा मनमानी कारभार आणि दुर्लक्षामुळे उड्डाणपुलाचे हे काम सतत अडखळत चालले होते. त्यात कामगारांना पगार न मिळाल्याने हे कामगार अनेकदा काम सोडून गेले.

अनेकदा त्यांनी संप करून चालू काम बंद पाडले. त्यामुळे हे काम दीर्घकाळ रेंगाळताना अगदी १०-१० तासांपर्यंत वाहतूक खोळंबण्याचे दुर्दैवी प्रकार घडले. सतत अपघात होऊन अनेकांचा प्राणही गेला. दरम्यान, अतिक्रमणाचाही मोठा अडथळा निर्माण झाल्याने हे काम रेंगाळले. तरीही कोल्हापूर नाका परिसरात संपादित जमिनींवरील अतिक्रमणे अद्याप काढण्यात आलेली नाहीत. त्याचबरोबर कोयना पूल परिसर ते कोल्हापूर नाका या भागातील अतिक्रमणामुळे सेवा रस्त्याचे व उड्डाणपुलाच्या भरावाचे काम रखडले आहे. त्यामुळे हे सर्व अडथळे दूर होऊन हा उड्डाणपूल सेवेत रुजू होण्याची प्रतीक्षा राहिली आहे.