मांजरा धरण व नागझरी जलाशयात उपलब्ध पाणी लातूरकरांना १५ जूनपर्यंतच नळाद्वारे पुरवता येईल. त्यानंतर भंडारवाडी प्रकल्पातून टँकरद्वारे पाणी दिले जाणार असल्याचे महापालिका आयुक्त सुधाकर तेलंग यांनी सांगितले.
गेल्या काही महिन्यांपासून शहराला दर दहा दिवसांनी पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याच्या गळतीचे प्रमाणही प्रचंड मोठे आहे. ५० टक्क्यांपेक्षा अधिक पाणी आजही वाया जाते. शहरातील पाणी वितरणाचे पाइप अतिशय जुने आहेत. त्याच्या दुरुस्तीसाठी ४२ कोटींचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर होणाऱ्या कामातून शंभर टक्के पाणीगळती थांबवता येईल व त्यानंतरच लातूरकरांना पाणी नियमित देणे शक्य होईल.
भविष्यात मांजरा धरण कोरडे पडल्यास अहमदपूरजवळील मन्याड प्रकल्पातून लातूर शहराला पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी मनपाने मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. त्याला मंजुरी मिळताच प्रस्ताव पाठवला जाणार आहे. टंचाई काळातच याचा वापर केला जाईल, असे हमीपत्रही राज्य सरकारला दिले जाणार आहे. १५ जूनपर्यंत पाऊस लांबल्यास लातूर शहराला रेणापूर तालुक्यातील भंडारवाडी प्रकल्पातून टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार आहे. त्याची तयारी मनपा प्रशासनाने केली आहे. नागरिकांनी पाण्याचा गरवापर टाळून सहकार्य करण्याचे आवाहन तेलंग यांनी केले आहे.