कोल्हापूर : पाणलोट क्षेत्रात सुरू असलेला पाऊस, धरणातून सुरू असलेला विसर्ग यामुळे कोल्हापुरातील पंचगंगा नदीचे पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडले आहे. शिरोळ तालुक्यातील सर्वच नद्या पात्राबरोबर भरून तुडुंब वाहू लागल्या आहेत.
कृष्णा-पंचगंगेच्या धरण पाणलोट क्षेत्रात सलग चार- पाच दिवस दमदार पाऊस पडत आहे. पंचगंगा नदीसह सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. इचलकरंजीत पुराचे पाणी लहान पुलाला घासून वाहत असल्याने लोखंडी कठडे लावून हा मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.
काळम्मावाडी, राधानगरी, कोयना, वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला असल्याने शिरोळ तालुक्यामध्ये कृष्णा, पंचगंगा, दूधगंगा, वारणा आदी नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. या तालुक्यात पावसामुळे २६ मे, १७ व २२ जुनला कृष्णेचे पाणी श्री दत्त मंदिराजवळ आले. २५ जून रोजी यंदाचा पहिला दक्षिणद्वार सोहळा झाला. १७ जूनपासून आजअखेर कृष्णा नदीचे पाणी नृसिंहवाडी श्री दत्त मंदिराजवळच वाहत आहे. तालुक्यातील कृष्णा-पंचगंगेची पाणी पातळी अतिशय संथ गतीने ओसरताना दिसत आहे.
पिके पाण्यात
शिरोळ तालुक्यातील बहुतांशी शेती ही नदीकाठावरच वसलेली आहे. गेल्या दहा बारा दिवसांपासून नदीकाठचे हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली आहे. याचा पीकवाढीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.